अमेरिका चीन युद्धाचा भडका उडू शकतो – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

माजी राष्ट्राध्यक्ष

वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकेत सध्या कमकुवत व भ्रष्ट सरकार सत्तेवर असून चीनच्या राजवटीने अमेरिकेचा आदर करण्याचे सोडून दिले आहे. याची परिणिती अमेरिका-चीन युद्धात होऊ शकते, असा इशारा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार युरोपमध्ये चीनबरोबर चर्चा करीत असतानाच ट्रम्प यांनी हा आरोप करून खळबळ माजविली.

गेल्या काही वर्षात अमेरिका व चीनमधील संबंधांमध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला होता. विशेषतः कोरोनाची साथ, चीनकडून होणारी व्यापारी लूट व मानवाधिकारांचे उल्लंघन, हेरगिरी, सायबरहल्ले यासारख्या अनेक मुद्यांवरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने चीनला धारेवर धरले होते. ट्रम्प यांनी चीनवर आक्रमक निर्बंध लादण्यासह कठोर कारवाई करणारे अनेक निर्णय घेतले होते. पण बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर, चीनवर अमेरिकेने टाकलेले दडपण संपुष्टात आल्याची टीका होत आहे. तैवानमध्ये लढाऊ विमानांची घुसखोरी करून चीनने आपल्याला बायडेन प्रशासनाची पर्वा नसल्याचे दाखवून दिले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या गंभीर इशार्‍यामागे ही पार्श्‍वभूमी आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष

चीन तैवानबाबत आधिकाधिक आक्रमक भूमिका स्वीकारत असताना, बायडेन प्रशासनाकडून चीनबरोबर चर्चेचे प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या महिन्याभरात बायडेन यांनी दोनदा चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून चर्चा केल्याचे सांगण्यात येते. या पार्श्‍वभूमीवर माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बायडेन यांना लक्ष्य केले. ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात अमेरिकेतील निवडणुकांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराचा उल्लेख केला आहे.

माजी राष्ट्राध्यक्ष

‘गैरमार्गाने झालेल्या निवडणुकांमुळे अमेरिकेत कमकुवत व भ्रष्ट सरकार सत्तेवर आले. या सरकारचा चीनसारखा देशही आदर करीत नाही. त्यामुळे नजिकच्या काळात अमेरिका व चीनमध्ये युद्ध होण्याची शक्यता आहे’, असा दावा ट्रम्प यांनी केला. यावेळी त्यांनी अफगाणिस्तान माघारीवरूनही त्यांनी बायडेन यांच्यावर टीकास्त्र सोडले. अमेरिकेच्या प्रशासनाने आपले लष्करी अधिकारी तालिबानसमोर शरणागती पत्करत असल्याचे पाहिले आणि या प्रशासनाने ८५ अब्ज डॉलर्सची प्रगत शस्त्रास्त्रेही तालिबानसाठी सोडून दिली, अशी टीका ट्रम्प यांनी केली.

अमेरिकेत सध्या सत्तेवर असलेल्या डेमोक्रॅट पक्षाची संभावना ‘कट्टर डाव्या विचारसरणीचे’ अशी करून त्यांचा भर फक्त निवडणुकांमध्ये गैरव्यवहार करण्यात व गुन्हेगारी कृत्यांवर आहे, असा आरोपही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. अमेरिका मोठ्या संकटात असून त्यातून देशाला बाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहनही माजी राष्ट्राध्यक्षांनी केले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info