गाझा/जेरूसलेम – इस्रायलची आर्थिक राजधानी मानल्या जाणार्या तेल अविवसह अश्खेलॉन, अश्दोद, लॉड या शहरांवर हमासने रॉकेट्सचा भीषण वर्षाव सुरू केला आहे. ३८ तासांच्या कालावधीत इस्रायलवर १०५० हून अधिक रॉकेट्सचा मारा करून हमासने आपण युद्धासाठी सज्ज असल्याची घोषणाच केली. तर दुसर्या बाजूला इस्रायलने गाझापट्ीतील हमास व इस्लामिक जिहादच्या पाचशेहून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ले चढविले. या घनघोर संघर्षात तीन दिवसांमध्ये ५९ जणांचा बळी गेल्याचे सांगितले जाते. हमासचा प्रमुख इस्माईल हनिया याने आता या संघर्षातून माघार शक्य नसल्याची घोषणा केली. इस्रायलची गाझावरील कारवाई थांबणार नाही, असे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी बजावले आहे.
आत्तापर्यंत हमास आणि इस्लामिक जिहाद यांनी प्रक्षेपित केलेले रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रे इस्रायलच्या निर्मनुष्य सीमाभागात कोसळत होते. पण रविवारपासून गाझापट्टीतील या दोन्ही दहशतवादी संघटनांनी डागलेले रॉकेट्स सीमेपासून दूर असलेल्या इस्रायली शहरांवर कोसळले आहेत. यामध्ये तेल अविव, हैफा, बिरशेबा, अश्खेलॉन, अश्दोद, लॉड या शहरांचा समावेश आहे. या रॉकेट हल्ल्यांच्या तीव्रतेमुळे इस्रायलला तेल अविव आंतरराष्ट्रीय विमानतळ रिकामे करून विमानसेवा बंद करावी लागली. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत इस्रायलमधील शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत.
रॉकेट्सच्या या जोरदार वर्षावामुळे इस्रायलच्या दिमोना शहरातील सायरन वाजल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. पण दिमोना शहरात रॉकेट कोसळले नसल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे. दिमोना येथे इस्रायलचा अणुप्रकल्प आहे. गेल्या महिन्यातच सिरियन लष्कराने प्रक्षेपित केलेले क्षेपणास्त्र या शहरात कोसळले होते. अशा परिस्थितीत, हमासच्या रॉकेट वर्षावामुळे पुन्हा एकदा दिमोना शहरात सायरन वाजल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते. गेल्या ३८ तासात गाझातून १०५० हून अधिक रॉकेट्सचा वर्षाव झाला. यातील ८० ते ९० टक्के रॉकेट्स भेदण्यात आयर्न डोम यंत्रणेला यश मिळाल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.
पण इस्रायलमध्ये कोसळलेल्या रॉकेट्समध्ये सहा जणांचा बळी गेला असून यामध्ये एका इस्रायली जवानाचा समावेश आहे. गाझाच्या सीमेवर गस्त घालणार्या लष्करी वाहनावर हमासच्या दहशतवाद्यांनी रणगाडाभेदी क्षेपणास्त्राचा हल्ला चढविला होता. यामध्ये इस्रायली जवानाचा बळी गेला. या हल्ल्यामुळे हमासकडे रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे असल्याची माहिती उघड झाली आहे. याशिवाय दहशतवाद्यांनी इस्रायलच्या अश्दोद शहरातील इंधन पाईपलाईनला लक्ष्य केले.
या रॉकेट्सच्या वर्षावाला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझातील हमास व इस्लामिक जिहादच्या ५०० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले. इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात ५३ जणांचा बळी गेल्याचा दावा हमासची आरोग्य यंत्रणा करीत आहे. पण यापैकी २५ हून अधिक हमास व इस्लामिक जिहादच्या दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. हमासच्या किमान सहा तर इस्लामिक जिहादच्या तीन मोठ्या कमांडरना ठार केल्याचा दावा इस्रायली संरक्षण मंत्रालयाने केला. हमास व इस्लामिक जिहादने आपल्या इमारती, कार्यालये नागरी भागात उभारली आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांवरील कारवाईत पॅलेस्टिनी जनतेचाही बळी जात असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे. गाझातील कारवाईसाठी इस्रायलने हवाईदलाबरोबर नौदलाचाही वापर केला. तसेच गाझापट्टीतील लष्कर घुसविण्याची तयारीही इस्रायलने केली आहे.
गाझातील हमासचा प्रमुख इस्माईल हनिया याने इस्रायलवर चढविलेल्या हल्ल्यांचे समर्थन केले. ‘जेरूसलेमच्या सुरक्षेसाठी हे रॉकेट हल्ले सुरू केले आणि यामध्ये आम्हाला यश मिळाले आहे. या संघर्षाचे मूळ जेरूसलेम असून जेरूसलेमसाठी सुरू केलेल्या संघर्षातून हमास माघार घेणार नाही’, अशी घोषणा हनियाने केली.
दुसर्या बाजूला इस्रायलचे संरक्षणमंत्री गांत्झ यांनी देखील हमासबरोबर संघर्षबंदी शक्य नसल्याचे ठणकावले. ‘इस्रायलने सुरू केलेली लष्करी मोहीम इतक्यास थांबणार नाही. सार्वभौमत्व आणि आपल्या जनतेच्या सुरक्षेबाबत इस्रायल कुठल्याही संघटनेचे किंवा आंतरराष्ट्रीय गटांचे नैतिक उपदेश ऐकून घेणार नाही’, असे गांत्झ यांनी फटकारले. ‘हमासला असे धक्के मिळतील, ज्याचा त्यांनी कधी विचारही केला नसेल. त्यांच्या वरिष्ठ कमांडर्सचा इस्रायल खातमा करील’, असा इशारा पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केला.
दरम्यान, इस्रायलच्या लॉड शहरात मंगळवारी पॅलेस्टिनी हल्लेखोरांनी ज्यूधर्मियांच्या ठिकाणांना लक्ष्य केले. त्यांनी इस्रायलींच्या प्रार्थनास्थळाची नासधूस केल्याच्या बातम्या आहेत. तसेच या जमावाने काही दुकाने पेटवून दिली. यामुळे लॉड शहरात पॅलेस्टिनी व इस्रायलींच्या गटांमध्ये दंगल पेटली होती. या हिंसाचारानंतर लॉड शहराच्या मेयरनी राजीनामा दिला असून आता इस्रायली सरकारने या शहराचे नियंत्रण घ्यावे, असे आवाहन केले आहे. यानंतर पोलादी पंजाचा वापर करून लॉड शहरातील कायदा व सुव्यवस्था कठोरपणे राबविली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी केली. तर इराण समर्थक गट या हिंसाचार आणि हल्ल्यांमागे असल्याचा आरोप इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रिव्हलिन यांनी केला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |