रशिया-नाटो संघर्षाचे रुपांतर अणुयुद्धात होईल

- रशियन नेते दिमित्रि मेदेवेदेव्ह यांचा इशारा

मॉस्को/ब्रुसेल्स – नाटोच्या सदस्य देशांकडून रशियन सीमेनजिक सुरू असणाऱ्या हालचालींमुळे नाटो व रशियात थेट संघर्ष भडकू शकतो. या संघर्षाचे रुपांतर पुढे अणुयुद्धातही होण्याचा धोका आहे, असा इशारा रशियाच्या ‘सिक्युरिटी कौन्सिल’चे उपाध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी दिला. युरोपातील फिनलँड व स्वीडन या देशांनी नाटोत प्रवेश करण्याचे संकेत दिले असतानाच मेदवेदेव्ह यांनी दिलेला अणुयुद्धाचा इशारा लक्षवेधी ठरतो. दरम्यान, रशियन प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी, फिनलँडसारख्या देशाने नाटोत सहभागी होण्याचा निर्णय घेणे हे रशियाविरोधी पाऊल असून त्याला योग्य प्रत्युत्तर मिळेल, असे बजावले आहे.

गुरुवारी फिनलँडच्या सरकारने एक निवेदन प्रसिद्ध करून आपण लवकरच नाटोच्या सदस्यत्वासाठी अर्ज करीत असल्याचे जाहीर केले. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर फिनलँडचे नाटोसंदर्भातील मत बदलले असून नाटोतील सहभागानंतर देशाची सुरक्षा अधिक मजबूत होईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले. फिनलँडच्या या निर्णयाचे नाटोसह अमेरिका व युरोपिय महासंघाने देखील स्वागत केले. फिनलँडच्या निर्णयानंतर आपणही लवकरच निर्णय जाहीर करु, असे स्वीडनने म्हटले आहे. मात्र रशियाकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

रशियाच्या ‘सिक्युरिटी कौन्सिल’चे उपाध्यक्ष मेदवेदेव्ह यांनी थेट अणुयुद्धाचा इशारा देऊन नाटोला परिणामांची जाणीव करून दिली. ‘नाटो सदस्य देश युक्रेनला शस्त्रे पुरवित आहेत. युक्रेनच्या जवानांना परदेशात प्रशिक्षण देण्यात येत आहे. परदेशातून भाडोत्री मारेकरी युक्रेनमध्ये धाडण्यात येत आहेत. रशियाच्या सीमेजवळ नाटो व सहकारी देशांचे सराव सुरू आहेत. यासह नाटोकडून सुरू असलेल्या हालचाली रशिया व नाटोमध्ये उघड संघर्षाचा भडका उडविणाऱ्या ठरू शकतात. रशिया व नाटोमधील या संघर्षाचे रुपांतर अणुयुद्धात होण्याचा धोका आहे’, असे मेदवेदेव्ह यांनी बजावले.

मेदवेदेव्ह यांच्या अणुयुद्धाच्या इशाऱ्यापूर्वी रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी फिनलँडच्या निर्णयावरून आक्रमक प्रतिक्रिया नोंदवली होती. फिनलँडने नाटोचे सदस्य बनणे हा रशियाच्या सुरक्षेसाठी उघड धोका ठरतो व त्याला योग्य ते प्रत्युत्तर मिळेल, असे पेस्कोव्ह यांनी बजावले. नाटोच्या विस्तारामुळे युरोप अधिक स्थिर व सुरक्षित होण्याची शक्यता नाही, याची जाणीवही रशियन प्रवक्त्यांनी करून दिली. दरम्यान, फिनलँड व स्वीडनच्या संभाव्य नाटो प्रवेशापूर्वी नाटोतील आघाडीचा सदस्य देश असलेल्या ब्रिटनने दोन्ही देशांबरोबर विशेष सुरक्षा सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. फिनलँड व स्वीडनवर हल्ला झाल्यास ब्रिटन त्याच्या सुरक्षेची जबाबदारी घेईल, अशी तरतूद या करारांमध्ये आहे. त्याचवेळी ब्रिटन या दोन्ही देशांबरोबर लष्करी तसेच गोपनीय माहितीची देवाणघेवाण वाढविणार असून संयुक्त लष्करी सरावही आयोजित केले जातील, असे करारात सांगण्यात आले. गेल्याच आठवड्यात स्वीडनने आपल्याला अमेरिकेकडून सुरक्षाविषयक हमी मिळाल्याचे जाहीर केले होते.

English     हिंदी

 

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info