- इस्रायल, गाझातील संघर्षात ८० ठार
- पॅलेस्टिनींसाठी लष्कर रवाना करण्याची तुर्कीची मागणी
- इराणचा पॅलेस्टिनींच्या संघर्षाला पाठिंबा
जेरूसलेम – गेल्या चार दिवसात शेकडो रॉकेट्सचे हल्ले चढविणार्या हमासने इस्रायलच्या दिमोना शहरात १५ रॉकेट्स डागल्याचा दावा केला आहे. दिमोना शहरात इस्रायलचा अतिशय महत्त्वाचा अणुप्रकल्प आहे. हमासच्या या दाव्याला इस्रायलने पुष्टी दिलेली नाही. आत्तापर्यंतच्या संघर्षात हमास व इस्लामिक जिहादने इस्रायलवर १५०० हून अधिक रॉकेट्सचे हल्ले चढविले आहेत. या संघर्षात ८० जणांचा बळी गेला आहे.
इस्रायल आणि गाझापट्टीमध्ये मोठा संघर्ष भडकला आहे. हमास आणि इस्लामिक जिहादच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या दूरवरच्या शहरांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सुमारे अडीचशे किलोमीटर अंतरावरील इस्रायलच्या शहरांमध्ये हमासचे रॉकेट्स कोसळत आहेत. गेल्या काही वर्षांमधील संघर्षात हमास आणि इस्लामिक जिहादने पहिल्यांदाच एवढ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. रॉकेट व क्षेपणास्त्रांना नष्ट करण्यासाठी इस्रायलने आयर्न डोमबरोबरच डेव्हिड स्लिंग ही हवाई सुरक्षा यंत्रणाही कार्यान्वित केली आहे.
आत्तापर्यंतच्या या संघर्षात ७२ पॅलेस्टिनी ठार झाले असून यामध्ये हमासच्या १० कमांडर्सचाही समावेश असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. बुधवारी इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझातील हमासची बारा मजल्याची इमारत नष्ट केली. हमासचे दहशतवादी इस्रायलविरोधात कट आखण्यासाठी या इमारतीत एकत्र आले होते, तेव्हा हा हल्ला चढविल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले. तर इस्रायलच्या हल्ल्यात लहान मुलांचा बळी जात असल्याचा आरोप हमास करीत आहे.
गाझातून झालेल्या रॉकेट हल्ल्यांमध्येही पाच वर्षाच्या मुलाचा बळी गेला असून इस्रायली लष्कराने त्याचा फोटो प्रसिद्ध केला आहे. आत्तापर्यंतच्या संघर्षात सात इस्रायली नागरिकांचा बळी गेला आहे. तर इस्रायली लष्कराने गाझापट्टीत ६०० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या जवानांच्या सुट्ट्या रद्द केल्या असून सुमारे सात हजार राखीव जवानांना सेवेवर दाखल होण्याचे आदेश दिले आहेत.
बुधवारी इस्रायलचे संरक्षणमंत्री आणि लष्करी अधिकार्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीत गाझापट्टीत लष्कर घुसविण्यावर निर्णय झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. इस्रायलचे रणगाडे आणि तोफा गाझापट्टीवर धडाडू लागल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही क्षणी इस्रायलचे लष्कर गाझात घुसून कारवाई करील, अशी चर्चा आहे. तर इस्रायल आणि वेस्ट बँकमधील शहरांतील ज्यूधर्मिय आणि पॅलेस्टिनींमधील दंगली रोखण्यासाठी संरक्षणमंत्री गांत्झ यांनी राखीव दलावर जबाबदारी सोपविली आहे.
इस्रायल आणि गाझापट्टीतील या संघर्षावर तुर्की, इराण या देशांमधून प्रतिक्रिया आल्या आहेत. इस्रायलच्या अत्याचाराविरोधात पॅलेस्टिनींनी सुरू केलेला संघर्ष असाच सुरू ठेवा आणि इस्रायलवर रॉकेट्सचा वर्षाव करण्याचा सल्ला इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी दिला आहे. तर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली. पॅलेस्टिनींच्या सुरक्षेसाठी गाझापट्टीमध्ये आंतरराष्ट्रीय लष्कर तैनात करावे, अशी मागणी एर्दोगन यांनी केली. तसेच इस्रायलला धडा शिकवायलाच हवा, अशी भूमिका एर्दोगन यांनी पुतिन यांच्यासमोर मांडल्याची तुर्कीच्या माध्यमांचे म्हणणे आहे.