रशियाच्या युक्रेनमधील क्षेपणास्त्र हल्ल्यांची तीव्रता वाढली

- मध्य युक्रेनमधील ‘ऑईल रिफायनरी’सह पूर्व व दक्षिण युक्रेनमध्ये हल्ले

मॉस्को/किव्ह – रशियाच्या बेल्गोरोद शहरात युक्रेनने चढविलेल्या हवाईहल्ल्यानंतर रशियन संरक्षणदलांनी आपल्या हल्ल्यांची तीव्रता अधिकच वाढविली आहे. रशियन फौजांनी मध्य युक्रेनमधील मोठ्या ‘ऑईल रिफायनरी’सह दक्षिण तसेच पूर्व युक्रेनमधील शहरांना लक्ष्य केले आहे. रशियाकडून सुरू असणार्‍या या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर, पाश्‍चिमात्य देशांनी युक्रेनला क्षेपणास्त्रे, रणगाडे व लढाऊ विमानांसह ‘हेवी वेपन्स’चा पुरवठा करावा, अशी आक्रमक मागणी युक्रेनच्या अधिकार्‍यांनी केली आहे. त्याचवेळी युक्रेनचा ‘अफगाणिस्तान’ करून रशियाला कोंडीत पकडण्याचे पाश्‍चिमात्य देशांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत, असा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार मिखायलो पोडोलिआक यांनी केला.

हल्ल्यांची तीव्रता

शुक्रवारी पहाटे रशिया-युक्रेन सीमेपासून अवघ्या ४० किलोमीटर्स अंतरावर असलेल्या बेल्गोरोद या रशियन शहरातील ऑईल डेपोवर हवाईहल्ला करण्यात आला. हा हल्ला युक्रेनच्या ‘एमआय-२४’ हेलिकॉप्टर्सनी केल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला होता. मात्र युक्रेनने त्यासंदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ केली होती. युक्रेनच्या या भूमिकेवर नाराजी दर्शविणार्‍या रशियाने क्षेपणास्त्रहल्ले चढवित प्रत्युत्तर दिल्याचे दिसत आहे. शनिवारी सकाळी रशियाने मध्य युक्रेनमधील ‘क्रेमेनचुक’ शहरातील ‘ऑईल रिफायनरी’ला लक्ष्य केले.

या हल्ल्यासाठी रशियाने दीर्घ पल्ल्याच्या ‘हाय प्रिसिजन मिसाईल्स’चा वापर केला. युक्रेनच्या पूर्व तसेच मध्य भागातील फौजांना या प्रकल्पातून इंधनपुरवठा करण्यात येत होता, अशी माहिती रशियन लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली. रशियाच्या हल्ल्यात ‘क्रेमेनचुक’ प्रकल्पातील इंधनाचे साठे करणारी यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावाही प्रवक्त्यांकडून करण्यात आला. या हल्ल्यांपाठोपाठ मध्य युक्रेनमधील ‘पोल्तावा’ व ‘डिनिप्रो’ शहरातील लष्करी धावपट्ट्या तसेच इतर केंद्रांना लक्ष्य करण्यात आल्याचे रशियाकडून सांगण्यात आले.

हल्ल्यांची तीव्रता

दक्षिण युक्रेनमधील महत्त्वाचे बंदर म्हणून ओळख असणार्‍या ओडेसा शहरातही रशियाने क्षेपणास्त्र हल्ले चढविले आहेत. या हल्ल्यात नागरी भागांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती युक्रेनने दिली. ओडेसावर तीन क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे सांगण्यात येते. पावलोव्हरॅड भागातील रशियन हल्ल्यात रेल्वेमार्गाची मोठी हानी झाल्याचे स्थानिक युक्रेनी अधिकार्‍यांनी सांगितले. रशियन संरक्षणदलाने पूर्व युक्रेनमधील भागावर पूर्ण ताबा मिळविण्यासाठी लुहान्स्कसह खेर्सन तसेच मुकोलेव्ह भागातही मोठे हल्ले सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

हल्ल्यांची तीव्रता

दरम्यान, रशियाच्या या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर पाश्‍चिमात्य देशांनी युक्रेनला ‘हेवी वेपन्स’चा पुरवठा करावा, अशी मागणी युक्रेनमधील वरिष्ठ अधिकार्‍यांनी केली आहे. आतापर्यंत देण्यात आलेल्या शस्त्रसहाय्याच्या बळावर रशियाला काही प्रमाणात रोखले असले तरी त्यांना मागे लोटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘हेवी वेपन्स’ची गरज आहे, असे युक्रेनी अधिकार्‍यांनी म्हटले आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार मिखायलो पोडोलिआक यांनी, युक्रेनमध्ये ‘अफगाणिस्तान’ घडवून रशियाला अडकविण्याचे पाश्‍चिमात्यांचे मनसुबे यशस्वी होणार नसल्याचा दावा केला आहे.

‘युक्रेनचे अफगाणिस्तानकरण करून रशियाला दीर्घकालिन संघर्षात अडकवून ठेवण्याचे इरादे यशस्वी होणार नाहीत हे आम्हाला सहकार्य करणार्‍या भागीदार देशांनी समजून घ्यायला हवे. पूर्व व दक्षिण युक्रेनव्यतिरिक्त इतर सर्व युक्रेनमधून रशिया माघार घेईल. फक्त याच दोन भागांमध्ये संरक्षणतैनाती करून रशिया आपली बाजू मजबूत करेल’, असा दावा युक्रेनी सल्लागार मिखायलो पोडोलिआक यांनी केला.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info