क्रिमिआतील ड्रोन हल्ल्यांनंतर रशियाचे युक्रेनमध्ये घणाघाती क्षेपणास्त्र हल्ले

- राजधानी किव्हसह १० प्रांतांमध्ये ५० क्षेपणास्त्रे डागली

मॉस्को/किव्ह – क्रिमिआतील नौदल तळावर झालेल्या ड्रोनहल्ल्याला रशियाने जोरदार प्रत्युत्तर दिले. सोमवारी रशियाने युक्रेनची राजधानी किव्हसह देशातील १० प्रांतांमध्ये जबरदस्त क्षेपणास्त्र हल्ले चढविले. या हल्ल्यांमध्ये रशियाने पायाभूत सुविधांसह लष्करी जागांना लक्ष्य केल्याची माहिती रशियाच्या संरक्षणविभागाने दिली. रशियाने इतक्या मोठ्या प्रमाणात युक्रेनवर क्षेपणास्त्रांचे हल्ले करण्याची या महिन्यातील ही तिसरी घटना ठरली आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला युक्रेनने क्रिमिआ व रशियाला जोडणाऱ्या कर्च ब्रिजवर दहशतवादी हल्ला चढविला होता. युक्रेनच्या या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनी राजवटीला घणाघाती प्रत्युत्तराचा इशारा दिला होता. त्यानंतर रशियाने युक्रेनची राजधानी किव्हसह अनेक प्रांतांवर क्षेपणास्त्र तसेच ड्रोन हल्ले सुरू केले होते. गेल्या काही दिवसांमध्ये रशियाने क्षेपणास्त्रांच्या तुलनेत ड्रोनहल्ल्यांवर अधिक भर दिल्याचे दिसून आले होते. मात्र क्रिमिआतील नौदलतळावर झालेल्या हल्ल्यानंतर रशिया पुन्हा आक्रमक झाला असून सोमवारचे क्षेपणास्त्रहल्ले त्याचा सूड असल्याचे दिसत आहे.

ड्रोन

सोमवारी पहाटेपासून रशियाने राजधानी किव्हसह युक्रेनच्या दहाहून अधिक प्रांतांवर क्षेपणास्त्रांनी हल्ले चढविले. यासाठी ‘टीयू-१६०’ व ‘टीयू-९५’ या बॉम्बर्स विमानांसह ‘केएच-५५’ या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. काही क्षेपणास्त्रे युद्धनौकांवरून डागण्यात आल्याचेही समोर आले आहे. रशियाने जवळपास ५० क्षेपणास्त्रांचा वापर केल्याची माहिती युक्रेनकडून देण्यात आली. राजधानी किव्हवर १० पेक्षा अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे स्थानिक यंत्रणांनी सांगितले.

याव्यतिरिक्त उत्तर युक्रेनमधील खार्किव्ह, मध्य युक्रेनमधील डिनिप्रोपेट्रोव्हस्क, विनित्सिआ, किरोवोहराड तसेच ओडेसा, झॅपोरिझिआ व पश्चिम युक्रेनमधील प्रांतांनाही लक्ष्य करण्यात आले. या प्रांतांमधील लष्करी ठिकाणांसह वीजपुरवठा तसेच पाणीपुरवठा केंद्रांवर हल्ले करण्यात आले. सोमवारच्या हल्ल्यानंतर राजधानी किव्हमधील ८० टक्के पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. तर युक्रेनमधील जवळपास ५० टक्के वीजक्षमता उद्धवस्त झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे येणाऱ्या हिवाळ्यात युक्रेनमधील जनतेला अंधारासह जीवघेण्या थंडीला तोंड द्यावे लागेल, असे संकेत स्थानिक यंत्रणांनी दिले आहेत.

दरम्यान, क्रिमिआतील हल्ल्यानंतर ‘ब्लॅक सी ग्रेन इनिशिएटिव्ह’मधून बाहेर पडलेल्या रशियाने पुढील काळात ब्लॅक सीमधून जहाजांची वाहतूक अडचणीत येऊ शकते, असे संकेत दिले आहेत. रशियाच्या सुरक्षा हमीशिवाय अन्नधान्याच्या निर्यातीसंदर्भातील करार पुढे नेणे धोकादायक ठरु शकते, असा इशारा रशियन सरकाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी दिला. त्याचवेळी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी शक्य होईल तोपर्यंत अन्नधान्याची वाहतूक सुरू ठेवण्यात येईल, असा दावा केला आहे. रशियाच्या इशाऱ्यानंतरही सोमवारी युक्रेनने जवळपास १० जहाजे अन्नधान्यांसह रवाना केल्याचे वृत्त समोर आले आहे.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info