हवाई – ‘एकाहून अधिक महासत्ता जगात असू शकतात, हे बाब चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला मान्य नाही. जगात फक्त एकच महासत्ता असू शकते, असा चीनचा समज आहे. यासाठी चीनला साम्राज्यशाहीचे जुने वैभव प्राप्त करायचे आहेत आणि इतरांना गुलाम बनवायचे आहे’, असा घणाघात अमेरिकेच्या पॅसिफिक हवाई कमांडचे प्रमुख जनरल केनिथ विल्सबॅश यांनी केला. म्हणूनच साऊथ चायना सीच्या क्षेत्रात चीनच्या सुरू असलेल्या कुटील कारवाया रोखण्यासाठी अमेरिकेच्या हवाईदलाने प्रसंगी इतर देशांच्या हवाईहद्दीत घुसून कारवाई करण्याची तयारी ठेवावी, असा इशारा जनरल विल्सबॅश यांनी दिला.
गेल्या चार दिवसांमध्ये चीनने आपल्या शेजारी आग्नेय आशियाई देशांविरोधातील लष्करी हालचाली तीव्र केल्या आहेत. चीनच्या तब्बल 16 विमानांनी मलेशियाच्या हवाईहद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला होता. तर चीनच्या लढाऊ आणि टेहळणी विमानांनी आपल्या हवाईहद्दीत नव्याने घुसखोरी केल्याचा आरोप तैवानने केला होता. याशिवाय फिलिपाईन्स, इंडोनेशिया, कंबोडिया या देशांबरोबरही चीनचे वाद सुरू आहेत. साऊथ चायना सीच्या क्षेत्रातील चीनच्या या वाढत्या अरेरावीवर जनरल विल्सबॅश यांनी ताशेरे ओढले.
‘चीनच्या कम्युनिस्ट पार्टीला सार्या जगावर राज्य करायचे आहे. जिथे गुलाम देश सभोवताली ठेवून, त्यांना गुडघ्यावर बसवून चीनला हुकूमत गाजवायची आहे’, असे सांगून जनरल विल्सबॅश यांनी चीनच्या कुटील कारवायांकडे माध्यमांचे लक्ष वेधले. ‘आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत असलेली बेटे चीनच्या मालकीची नाहीत, अशा बेटांच्या हद्दीतही चीनच्या कुटील कारवाया सुरू आहेत’, असा ठपका विल्सबॅश यांनी ठेवला.
मलेशिया आणि तैवानच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करून चीन प्रक्षोभक आणि या क्षेत्रात अस्थैर्य वाढविणार्या कारवाया करीत असल्याची टीका अमेरिकेच्या पॅसिफिक कमांडच्या हवाई कमांड प्रमुखांनी केली. ‘चीनच्या या कारवायांवर करडी नजर ठेवण्याची आवश्यकता आहे. चीनच्या कुठल्याही कुरापतींना उत्तर देण्यासाठी व प्रसंगी दुसर्या देशाच्या हवाईहद्दीत कारवाईची तयारी अमेरिकेने ठेवायला हवी. यासाठी चीनच्या प्रत्येक हालचालीची माहिती या क्षेत्रातील देशांनी अमेरिकेला द्यावी’, असे आवाहन विल्सबॅश यांनी केले.
दरम्यान, येत्या काळात चीन तैवानचा ताबा घेऊ शकतो, असा इशारा अमेरिका तसेच आंतरराष्ट्रीय विश्लेषक देत आहेत. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडने या क्षेत्रातील आपली हवाई व सागरी गस्त वाढविली आहे. त्याचबरोबर फिलिपाईन्समधील लष्करी तळ आणि संरक्षणविषयक सहकार्याबाबतही अमेरिकेच्या लष्करी अधिकार्यांची चर्चा सुरू असल्याच्या बातम्या आल्या होत्या.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |