‘वुहान लॅब लीक’ फेटाळून अमेरिकेने चूक केली – अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिसा राईस

‘वुहान लॅब लीक’ फेटाळून अमेरिकेने चूक केली – अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिसा राईस

वॉशिंग्टन – ‘‘ ‘वुहान लॅब लीक थिअरी’ नाकारून अमेरिकेने फार मोठी चूक केलेली आहे. ही चूक मान्य करून आता अमेरिकेने चीनबाबत आक्रमक भूमिका स्वीकारावी. या साथीच्या तपासासाठी चीनला सहकार्य करण्यास अमेरिकेने भाग पाडायला हवे. चीन याबाबत सहकार्य करून पारदर्शकता दाखवित नसेल, तर हा प्रश्‍न संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित करण्याची तयारी अमेरिकेने करायला हवी’, असे अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिसा राईस यांनी म्हटले आहे. त्याचवेळी कोरोनाच्या संदर्भात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारलेली भूमिका योग्यच असल्याचे निष्पन्न झाले, असा टोला राईस यांनी लगावला.

‘वुहान लॅब लीक’

अमेरिकेतील कोरोनाच्या बळींची संख्या सहा लाखांच्याही पुढे गेलेली आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची साथ म्हणजे चीनने छेडलेले जैविक युद्धच असल्याचे स्पष्ट करणारे पुरावे व माहिती माध्यमांमध्ये येत आहे. यामुळे ‘वुहान लॅब लीक थिअरी’ अर्थात कोरोनाचा विषाणू चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच पसरविण्यात आल्याच्या दाव्याला दुजोरा मिळत आहे. यामुळे कोरोनाचा विषाणू नैसर्गिक असल्याचे दावे ठोकणारे अमेरिकेचे आरोग्यविषयक सल्लागार व संशोधक आणि माध्यमे अडचणीत सापडली आहेत. अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिसा राईस यांनीही ‘वुहान लॅब लीक थिअरी’ नाकारून अमेरिकेने अमेरिकेने फार मोठी चूक केली, असे फटकारले आहे. याबाबत अत्यंत घाईने निष्कर्ष नोंदविण्यात आला, पण आता याबाबतचे पुरावे आपल्यासमोर येत आहेत, असे सांगून राईस यांनी यासाठी अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबरच माध्यमांनाही धारेवर धरले.

चीनच्या वुहान प्रयोगशाळेची पाहणी करून आलेल्या अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी इथली व्यवस्था दुय्यम दर्जाची असल्याचे निरिक्षण नोंदविले होते. तसेच या ठिकाणी बरेच काही सुरू असल्याचे संकेतही मिळत होते. तरीही याचा तपास करण्यात आला नाही. याला अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबरच माध्यमे देखील जबाबदार आहेत, असे राईस म्हणाल्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाबाबत स्वीकारलेली भूमिका योग्यच होती. त्यांनी कोरोनाची साथ रोखण्यासाठी चीनबरोबरील हवाई सेवा रोखण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यावेळी या निर्णयाची वंशद्वेषी म्हणून हेटाळणी करण्यात आली होती, याची आठवण राईस यांनी करून दिली.

‘वुहान लॅब लीक’

कोरोनाबाबतची ही चूक मान्य करून अमेरिकेने आता चीनबाबत अधिक आक्रमक भूमिका स्वीकारण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला कॉन्डोलिसा राईस यांनी बायडेन प्रशासनाला दिला. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या तपासासाठी पाठविलेल्या पथकाने कुठे तपास करायचा आणि कुठे नाही, यावर चीनने नियंत्रण ठेवले होते. हे सारे अमेरिकेने याआधी खपवून घेतले. पण आता कोरोनाच्या तपासासाठी अमेरिकेने चीनला सहकार्य करण्यास भाग पाडायला हवे. याबाबत चीन पारदर्शक भूमिका स्वीकारणार नसेल, तर अमेरिकेने संयुक्त राष्ट्रसंघात हा प्रश्‍न उपस्थित करायला हवा, असे सांगून राईस यांनी चीनबरोबर बायडेन प्रशासनावरील दडपण वाढविले आहे. दरम्यान, चीन हा अमेरिकेचा सर्वात मोठा प्रतिद्वंद्वी बनला आहे, ही बाब देखील कॉन्डोलिसा राईस यांनी मान्य केली. अमेरिकेचा एकेकाळचा प्रतिस्पर्धी सोव्हिएत रशियापेक्षाही चीन अधिक प्रबळ आहे, याकडे राईस यांनी लक्ष वेधले. सोव्हिएत रशिया लष्करीदृष्ट्या सामर्थ्यशाली असला तरी तंत्रज्ञान आणि आर्थिकदृष्ट्या अमेरिकेपेक्षा खूपच मागे होता. पण आत्ताच्या चीनचे तसे नाही. चीन तंत्रज्ञान आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ आहे, अशा नेमक्या शब्दात राईस यांनी चीनपासून अमेरिकेला संभवणारा धोका अधोरेखित केला.

अमेरिकन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कॉन्डोलिसा राईस चीनबाबत हा इशारा दिला. त्याच्या काही दिवस आधी कॉन्डोलिसा राईस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत लक्षवेधी विधाने केली होती. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आपल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले, असे मानणार्‍या अमेरिकेतील समाजगटाला डोनाल्ड ट्रम्प आपले नेते वाटत होते, त्यांच्याशी ट्रम्प यांनी उत्तमरित्या संवाद साधला होता, असे निरिक्षण राईस यांनी नोंदविले. राजकीय अभ्यासक म्हणून आपण याकडे अत्यंत बारकाईने पाहत होते, असे सांगून राईस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकारणाकडे तुच्छतेने पाहणार्‍यांना समज दिली.

आपल्याला आव्हान देणआर्‍या डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव करण्यासाठी चीनने कोरोनाची साथ पसरविल्याचा आरोप अमेरिकेत सुरू झाला आहे. कोरोनाच्या साथीबाबत आत्ता समोर येत असलेली माहिती वर्षभरापूर्वी आली असती, तर ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले असते, असे एकाच दिवसापूर्वी सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी म्हटले होते. कारण अमेरिकेच्या विरोधात जैविक युद्ध छेडणार्‍या चीनला कणखरपणे कोण प्रत्युत्तर देऊ शकतो, हा प्रश्‍न त्यावेळी अमेरिकी जनतेसमोर आला असता. त्याचा फायदा ट्रम्प यांना मिळाला असता, असे ग्रॅहम यांनी म्हटले होते.

अत्यंत काटेतोल व सूचक शब्दात आपली भूमिका मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कॉन्डोलिसा राईस यांच्या विधानातूनही हीच बाब ध्वनीत होत आहे. म्हणूनच चीनने कोरोनाच्या तपासाबाबत सहकार्य केले नाही, तर हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित करण्याची राईस यांनी केलेली मागणी अत्यंत महत्त्वाची ठरते.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info