बीजिंग/वॉशिंग्टन/तैपेई – तैवानसंदर्भात चीनकडून घेण्यात येणार्या निर्णयात अमेरिका हस्तक्षेप करु शकत नाही, असे चीनच्या लष्करी प्रवक्त्यांनी बजावले आहे. त्याचवेळी तैवानसमोर चीनबरोबरील विलिनीकरण हा एकमेव पर्याय असून तैवानचे स्वातंत्र्य म्हणजे युद्धाला निमंत्रण ठरेल, असा इशाराही संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते रेन गुओकिआंग यांनी दिला. अमेरिकी सिनेटर्सचा तैवान दौरा, कोरोना लसींचा पुरवठा व त्यापाठोपाठ विनाशिकेची गस्त यामुळे चीन अस्वस्थ असून नवी धमकी त्यावर उमटलेली प्रतिक्रिया असल्याचे दिसत आहे.
‘चीनकडून तैवानसंदर्भात सुरू असलेल्या हालचालींना कोणीही रोखू शकत नाही. अमेरिकेने ही बाब ध्यानात ठेवावी. त्याचवेळी अमेरिका व तैवानमधील राजनैतिक पातळीवरील कोणत्याही प्रकारची अधिकृत देवाणघेवाण अथवा लष्करी संबंधांना चीनचा ठाम विरोध आहे, हे देखील लक्षात ठेवावे’, असा इशारा चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते गुओकिआंग यांनी दिला. तैवानपुढे चीनशी विलिनीकरण हा एकमेव मार्ग उपलब्ध असून तैवानचे स्वातंत्र्य म्हणजे युद्धाला निमंत्रण असेल. त्यासाठी अमेरिकेचे सहाय्य घ्याल तर अपयशीच ठराल, अशा शब्दात चिनी प्रवक्त्यांनी पुढे धमकावले.