वॉशिंग्टन – ‘सारे जग अणुयुद्धाच्या जवळ पोहोचले आहे. शत्रूदेश असलेल्या रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि इराण यांच्याबरोबर अमेरिकेचे अणुयुद्ध भडकू शकते’, असा गंभीर इशारा अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने आपल्या अहवालातून दिला. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर दुसर्याच दिवशी, ‘कॉन्फरन्स ऑन डिसआर्मामेंट’मध्ये अमेरिकेच्या राजदूतांनी चीन विकसित करीत असलेल्या नव्या आण्विक तंत्रज्ञानावर चिंता व्यक्त केली. नौदल आणि हवाईदलाला अण्वस्त्रसज्ज करण्यासाठी चीनच्या सुरू हालचाली स्थैर्यासाठी धोका असल्याचा इशारा अमेरिकेच्या राजदूतांनी दिला.
अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने गेल्या आठवड्यात 67 पानी अहवाल प्रसिद्ध केला. ‘जॉईंट न्यूक्लिअर ऑपरेशन्स’ शीर्षक असलेला हा अहवाल ‘फेडरेशन ऑफ अमेरिकन सायन्टिस्ट्स’ने तयार केला आहे. यामध्ये अमेरिका व शत्रूदेश रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि इराण यांच्यातील अणुयुद्धाचा धोका अधिकच बळावल्याचा इशारा दिला. गेल्या दशकभरात रशिया आणि चीन आपल्या अण्वस्त्रांचे अद्ययावतीकरण करून त्यांची संख्या वाढविल्याचे यात म्हटले आहे.
‘या दशकभरात या चारही देशांनी आपल्या अण्वस्त्रांची संख्या व क्षमता कमी करावी, यासाठी अमेरिकेने प्रयत्न केले. पण शत्रूदेशांनी उलट दिशेने प्रवास सुरू करून अण्वस्त्रांची संख्या वाढवून त्यांचे अद्ययावतीकरण सुरू ठेवले. यामुळे जगाच्या वेगवेगळ्या भागात या अण्वस्त्रसज्ज शत्रूदेशांबरोबर संघर्ष भडकण्याची व त्यातून अणुयुद्ध पेटण्याची शक्यता वाढली आहे’, असे या अहवालात बजावले. रशिया आणि चीन यांच्यापासून अमेरिकेला सर्वाधिक धोका असल्याचा दावा यात केला आहे.
रशियाबरोबर ‘इंटरमिजिएट-रेंज न्यूक्लिअर फोर्सेस’ (आयएनएफ) आणि ‘स्ट्रॅटेजिक आर्म्स रिडक्शन ट्रिटी’ (स्टार्ट) हे करार करून अण्वस्त्रांची संख्या मर्यादित करण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न केले. पण या करारानंतरही रशियाने आपली अण्वस्त्रे अद्ययावत केली. तर अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याशी स्पर्धा करणार्या चीनने देखील आपल्या अण्वस्त्रांचे अद्ययावतीकरण केल्याचे या अहवालात म्हटले आहे. चीनच्या आण्विक तयारीवर स्वित्झर्लंडमधील ‘कॉन्फरन्स ऑन डिसआर्मामेंट’मध्ये अमेरिकेचे राजदूत रॉबर्ट वुड यांनी चिंता व्यक्त केली. पाण्यातून प्रवास करणारे ड्रोन्स किंवा लढाऊ विमानावर सज्ज करता येणारी क्रूझ क्षेपणास्त्रे अण्वस्त्रांनी सज्ज करण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप वुड यांनी केला. चीन आपल्या इराद्यांमध्ये यशस्वी ठरला तर सामरिक स्थैर्य धोक्यात येईल. कारण असे आण्विक तंत्रज्ञान अमेरिकेकडे देखील नाही, याची जाणीव वुड यांनी जीनिव्हा परिषदेला करुन दिली.
दरम्यान, याआधीही अमेरिकेचे अधिकारी आणि लष्करी विश्लेषकांनी आण्विक युद्धाच्या धोक्याविषयी बजावले होते. पण पेंटॅगॉनच्या अहवालाने हे आण्विक युद्ध अमेरिका आणि रशिया, चीन, उत्तर कोरिया व इराणमध्ये भडकेल, असा इशारा देऊन परिस्थितीचे गांभीर्य वाढविले आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |