- ताजिकिस्तानजवळची सीमा तालिबानच्या ताब्यात
- तुर्कमेनिस्तानच्या नेत्यांशी तालिबानची चर्चा
काबुल – गेल्या चोवीस तासात अफगाणिस्तानचे लष्कर आणि तालिबानच्या दहशतवाद्यांमध्ये पेटलेल्या संघर्षात 282 जण ठार झाले. यामध्ये तालिबानच्या 271 दहशतवाद्यांचा समावेश असल्याची माहिती अफगाणी संरक्षण मंत्रालयाने दिली. गेल्या दहा दिवसात तालिबानने अफगाणिस्तानातील शंभरहून अधिक जिल्ह्यांचा ताबा घेतल्याचा दावा केला जातो. उत्तरेकडील ताजिकिस्तानच्या सीमाही तालिबानच्या ताब्यात गेल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत राजधानी काबुल तालिबानच्या हाती पडू नये, यासाठी राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी लष्करासह प्रांतिक सरकार व सशस्त्र टोळ्यांची आघाडी उभारली आहे.
गेल्या आठवड्यात तालिबानने इराण, पाकिस्तान आणि उत्तरेकडील ताजिकिस्तानच्या सीमेजवळच्या चौक्यांचा ताबा घेऊन खळबळ उडवून दिली होती. यासाठी आपल्याला रक्ताचा एक थेंबही सांडावा लागला नसल्याचा दावा तालिबानने केला होता. त्यानंतर अफगाणी संरक्षण मंत्रालयाने तालिबानवरील कारवाई तीव्र केली. या दहशतवादी संघटनेच्या ताब्यात गेलेला भूभाग पुन्हा नियंत्रणाखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अफगाणी लष्कराने जाहीर केले.
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सोमवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या 15 प्रांतांमध्ये सुरू असलेल्या कारवाईत तालिबानचे 271 दहशतवादी मारले गेले तर 162 जण जखमी झाले. यामध्ये कंदहार, हेरात, हेल्मंड, नांगरहार, कुंदूझ, फराह या प्रांतांचा समावेश आहे. यापैकी हेल्मंड प्रांतात तालिबानने घडविलेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये 11 जवानांचा बळी गेला.
तर हेरात प्रांतातील सलमा धरणावर हल्ल्याचा दहशतवाद्यांचा डाव फसला. अफगाणी लष्कराने याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानी नागरिकाचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. हेरातमधील या सलमा धरणाचे बांधकाम भारताने करून दिले होते. यासाठी अफगाणिस्तानने भारताचे आभार व्यक्त केले होते. त्यामुळे पाकिस्तानचे दहशतवादी अफगाणिस्तानातील भारताशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करीत असल्याचे समोर येत आहे.
या शिवाय तालिबानने गझनी शहराला घेराव टाकला असून येथे अफगाणी लष्कराबरोबर मोठा संघर्ष सुरू आहे. तालिबानचे दहशतवादी अफगाणींच्या घरात लपून लष्करावर हल्ले चढवित असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे तालिबानवर हल्ले चढविणे अवघड होत असल्याची माहिती स्थानिक अधिकार्याने दिली. अफगाणिस्तानच्या इतर शहर, गावांमध्येही तालिबान असाच संघर्ष करीत असल्याच्या बातम्या येत आहेत.
तर काही भागात अफगाणी लष्करासमोर गोळ्या चालविण्याची गरज नसल्याचा दावा तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहिन याने केला. अफगाणी लष्कराला गनी सरकारवर विश्वास राहिलेला नाही, म्हणून काही भागात अफगाणी जवान स्वत:हून शरणागती पत्करून तालिबानमध्ये सामील होत असल्याची माहिती तालिबानच्या प्रवक्त्याने दिली. या दाव्याला समर्थन देणारे काही व्हिडिओ समोर आले होते. अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील भागात तालिबानने अशाप्रकारे ताबा घेतल्याचे दावे केले गेले होते.
तालिबानच्या या हल्ल्यांपासून राजधानी काबुल आणि इतर महत्त्वाची ठिकाणी संरक्षित करण्यासाठी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी लष्कराबरोबर प्रांतिक सरकार व टोळ्यांची आघाडी उभारली आहे. काबुलमधील विमानतळाच्या सुरक्षेसाठी हवाई सुरक्षा यंत्रणा तैनात केली. अशीच आघाडी अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील भागातही उभारली असून येथील टोळ्या गनी सरकारकडे तालिबानविरोधात लढण्यासाठी शस्त्रास्त्रांची मागणी करीत आहेत.
दरम्यान, ताजिकिस्तानच्या सीमेजवळील सुरक्षाचौक्याही तालिबानच्या ताब्यात गेल्याची बातमी इराणी वृत्तसंस्थेने दिली. येथील सीमेवर तालिबानने पूर्ण नियंत्रण मिळविले असून ताजिकिस्ताननेही आपल्या लष्कराला सावध राहण्याची सूचना केली आहे. तर दोन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी तालिबानचे प्रतिनिधी तुर्कमेनिस्तानमध्ये गेले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |