इस्रायली राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत तेल अवीवमध्ये युएईचा दूतावास सुरू

युएईचा दूतावास

तेल अवीव/दुबई – इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हरझॉग यांच्या उपस्थितीत बुधवारी तेल अवीवमध्ये संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) दूतावासाचे उद्घाटन करण्यात आले. इस्रायलमध्ये आखाती अरब देशाने दूतावास सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इस्रायल व युएईमध्ये ऐतिहासिक शांतीकरारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दोन्ही देशांशी परस्परांशी सहकार्य वाढविण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली असून दूतावास सुरू होणे हा त्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

‘इस्रायलमध्ये दूतावास उघडणे ही अत्यंत सन्मानाची बाब आहे. 10 महिन्यांपूर्वी दोन्ही देशांनी अब्राहम करारावर स्वाक्षर्‍या केल्या होत्या. दोन्ही देशांमधील जनतेत शांतता व समृद्धीचे नाते निर्माण व्हावे हा दृष्टिकोन त्यामागे होता. दूतावास चालू होणे ही फक्त सुरुवात आहे. युएई व इस्रायल हे दोन्ही देश नव्याचा शोध घेणारे देश म्हणून ओळखले जातात. ही नवी दृष्टी दोन्ही देशांच्या संपन्नतेसाठी उपयुक्त ठरेल’, अशा शब्दात युएईचे राजदूत मोहम्मद महमूद अल खाजा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/uae-embassy-opens-in-tel-aviv-in-the-presence-of-the-israeli-president/