कोरोनाची लाट जर्मनीत एक लाख जणांचा बळी घेईल – वैद्यकतज्ज्ञ ख्रिस्तिअन ड्रस्टन यांचा इशारा

ख्रिस्तिअन ड्रस्टन

बर्लिन – कोरोनाच्या साथीमुळे जर्मनीत सध्या खरोखरच आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून या लाटेत देशात सुमारे एक लाख जणांचा बळी जाईल, असा इशारा जर्मन व्हायरॉलॉजिस्ट ख्रिस्तिअन ड्रस्टन यांनी दिला. जर्मनीत गेल्या ४८ तासांमध्ये ९० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून प्रतिदिन दगावणार्‍यांची संख्याही २००च्या वर गेली आहे. जर्मनीत आतापर्यंत ४९ लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली असून बळींची एकूण संख्या ९७ हजारांवर गेली आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) सध्या कोरोनाचा फैलाव वाढत असणारा युरोप हा एकमेव खंड असल्याचे बजावले होते. युरोपात गेले दीड महिने सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे डब्ल्यूएचओने निदर्शनास आणून दिले होते. जर्मनीतील वाढती रुग्णसंख्या त्याला दुजोरा देणारी ठरत आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून जर्मनीत दररोज कोरोनाचे ३० हजारांहून अधिक रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती.

ख्रिस्तिअन ड्रस्टन

मंगळवारी ही संख्या ४० हजारांवर गेली तर बुधवारी रुग्णांच्या संख्येने नवा विक्रम नोंदवित ५० हजारांचा टप्पा ओलांडला. वेगाने वाढत्या या रुग्णसंख्येमागे शिथिल केलेल निर्बंध, नुकत्याच झालेल्या निवडणुका, लसीकरणाबाबतची उदासिनता व हिवाळा हे घटक कारणीभूत ठरल्याचे समोर येत आहे. जर्मनीत संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या सुमारे ६७ टक्के आहे. जर्मन सरकारने जनतेला वारंवार आवाहन केले असले तरी लसीकरणाची सक्ती करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे लसीकरणाची गती संथ राहिली असून हा वाढती रुग्णसंख्या तसेच रुग्ण दगावण्यामागील प्रमुख घटक मानला जातो.

ख्रिस्तिअन ड्रस्टन

या पार्श्‍वभूमीवर जर्मनीतील आघाडीचे वैद्यकतज्ज्ञ व्हायरॉलॉजिस्ट ख्रिस्तिअन ड्रस्टन यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. ‘जर्मनीत सध्या कोरोनामुळे उद्भवलेली स्थिती ही खरी आणीबाणीची स्थिती आहे. देशातील जवळपास दीड कोटी नागरिकांचे अजूनही लसीकरण झालेले नाही. ही अत्यंत वाईट बाब ठरते. जर्मनीला कोणत्याही परिस्थितीत वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी हालचाली करायला हव्यात. जर्मनीतील सध्याची लाट ही सर्वात भयानक लाट असल्याचे दिसत आहे. या लाटेत एक लाख जणांचा बळी जाऊ शकतो’, असे ड्रस्टन यांनी बजावले.

जर्मनीव्यतिरिक्त ग्रीस, फ्रान्स, स्लोवाकिया व झेक रिपब्लिकमध्येही रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे समोर येत आहे. युरोपिय देशांव्यतिरिक्त रशिया व युक्रेन या देशांमध्येही दरदिवशी विक्रमी रुग्णांची नोंद होत असल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. रशियात गेल्या दोन दिवसात ७०हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून गेले दोन आठवडे दररोज एक हजारांहून अधिक जणांचा बळी जात आहे. तर युक्रेनमध्ये ४८ तासांच्या अवधीत ४० हजारांहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून दीड हजारांहून अधिक जण दगावले आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info