काबुल – गेल्या चोवीस तासात अफगाणी लष्कराने 12 प्रांतात हल्ले चढवून तालिबानचे 136 दहशतवादी ठार केले. त्याचबरोबर अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असलेल्या चारजणांना अटक करून सुमारे 400 किलोचे अमली पदार्थ ताब्यात घेतले. अफगाणिस्तानात हा संघर्ष सुरू असताना, तालिबानच्या नेत्याने अफगाणिस्तानातील संघर्ष संपविण्यााठी वाटाघाटींच्या माध्यमातून राजकीय तोडगा काढण्याची तयारी दाखविली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून अफगाणिस्तानात सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी कतारची राजधानी दोहा येथे अफगाण सरकार आणि तालिबानमध्ये चर्चा सुरू आहे. अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अब्दुल्लाह व तालिबानचे वरिष्ठ कमांडर या चर्चेत सहभागी आहेत. दुसर्या दिवशी सुरू असलेल्या या चर्चेतून संघर्षबंदीची घोषणा होईल, असा दावा करण्यात येत होता. सार्या जगाचे लक्ष या चर्चेकडे लागलेले असताना, तालिबानचा प्रमुख मुल्ला हिबातुल्ला अखुंदझदा याने रविवारी वाटाघाटींद्वारे या समस्येवर राजकीय तोडगा काढण्याची तयारी दाखविली.
‘अफगाणिस्तानातील बहुतांश जिल्ह्यांचा तालिबानने ताबा घेतला आहे. तरीही अफगाणिस्तानातील संघर्षावर वाटाघाटींच्या माध्यमातून राजकीय तोडगा काढण्यासाठी तालिबान तयार आहे. अफगाणिस्तानात इस्लामी राजवट प्रस्थापित करून शांती आणि सुरक्षा प्रस्थापित करण्याच्या प्रत्येक संधीसाठी आम्ही तयार आहोत’, अशी घोषणा अखुंदझदा याने केली. त्याचबरोबर अफगाणिस्तानचे सरकार शांतीचर्चेत वेळ फुकट घालवित असल्याचा आरोप तालिबानच्या प्रमुखाने केला. त्याचवेळी तालिबान अफगाणिस्तानात इस्लामी नियमांवर आधारलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणेल, असे सांगून अखुंदझदा याने पत्रकारांनी ही बाब लक्षात घ्यावी, असे बजावले.
दरम्यान, अफगाणी लष्कराने तालिबानच्या प्रमुख ठिकाणांवरील हवाई हल्ले वाढविले आहेत. कंदहार, तखर, परवान, कपिसा या प्रांतांमध्ये हवाई कारवाई सुरू केली. अफगाणी लष्कराच्या या हवाई कारवाईला सहाय्य म्हणून अमेरिकेने सात हेलिकॉप्टर्स पुरविल्याच्या बातम्या येत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |