‘बॅटल ऑफ द अटलांटिक’मध्ये रशियाला रोखण्यासाठी अमेरिकेत ‘जॉईंट फोर्स कमांड’ कार्यान्वित झाली – नाटोची घोषणा

‘जॉईंट फोर्स कमांड’

नॉरफोल्क – ‘अटलांटिक क्षेत्रातील सुरक्षाविषयक आव्हाने अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. अशा परिस्थितीत नॉरफोल्कमधील कमांड या क्षेत्रातील सुरक्षा व स्थैर्यासाठी नाटोची वचनबद्धता दाखवून देणारी ठरते. शत्रूला रोखण्यासाठी निर्णायक संकेत देणारी ही कमांड उत्तर अमेरिका व युरोपिय देशांची सुरक्षा आश्‍वस्त करणारी ठरते’, या शब्दात नाटोचे कमांडर व्हाईस अ‍ॅडमिरल ऐंड्य्रू लुईस यांनी अमेरिकेच्या नॉरफोल्क तळावरील ‘जॉईंट फोर्स कमांड’ पूर्ण क्षमतेने सक्रिय झाल्याची घोषणा केली. यावेळी अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी सदर कमांडचे मुख्य कार्य ‘बॅटल ऑफ द अटलांटिक’ लढणे असल्याकडे लक्ष वेधले.

रशियाच्या वाढत्या लष्करी हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर 2018 साली नाटोने दोन स्वतंत्र कमांड्सची घोषणा केली होती. त्यातील एक कमांड युरोपमध्ये तर दुसरी अमेरिकेत असेल, असे सांगण्यात आले होते. याच कालावधीत अमेरिकेनेही आपल्या नौदलाचे दुसरे आरमार (सेकंड फ्लीट) पुन्हा कार्यरत करण्याचे जाहीर केले होते. नाटोची नवी कमांड अमेरिकेच्या या दुसर्‍या आरमाराबरोबर संयुक्तरित्या काम करणार आहे. नव्या ‘जॉईंट फोर्स कमांड’मध्ये दीडशेहून अधिक जवान व अधिकार्‍यांचा समावेश आहे.

Read more: http://newscast-pratyaksha.com/marathi/us-launches-joint-force-command-to-stop-russia-in-battle-of-atlantic/