काबुल – ‘पाकिस्तानने प्रचारतंत्राद्वारे कितीही करामती केल्या तरी यामुळे वास्तव आणि माझ्या देशातील पाकिस्तानची प्रतिमा सुधारणे शक्य नाही. कारण अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या भीषण हल्ल्यांचा सूत्रधार, सहाय्यक आणि मालक पाकिस्तानी लष्कर आहे व हेच वास्तव आहे’, असे घणाघाती प्रहार अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी केले. अफगाणिस्तानचे नेते आपल्या अपयशाचे खापर पाकिस्तानवर फोडत आहेत, अशी टीका पाकिस्तानचे सरकार व आजी-माजी लष्करी अधिकारी करीत आहेत. मात्र अफगाणिस्तानात तालिबान घडवित असलेल्या रक्तपाताला दुसरे कुणीही नाही, तर पाकिस्तानच जबाबदार आहे, असे अफगाणिस्तान ठासून सांगत असून याचे आंतरराष्ट्रीय परिणाम दिसू लागले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे नेते व लष्कराच्या प्रभावाखालील माध्यमे अफगाणिस्तानातील अश्रफ गनी सरकारला लक्ष्य करीत आहेत. तालिबान वाटाघाटीसाठी तयार असले तरी राष्ट्राध्यक्ष गनी यांना सत्ता सोडायची नसल्याचा आरोप पाकिस्तानातून केला जातो. त्याचबरोबर तालिबान आणि पाकिस्तानमध्ये कुठलेही सहकार्य नसल्याचा दावा पाकिस्तानचे नेते करीत आहेत. याउलट अफगाणींसाठी पाकिस्तानने दिलेल्या बलिदानाचे दाखले पाकिस्तानी नेते व माध्यमांकडून दिले जातात.