वॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकी शेअरबाजारातील चिनी कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रमी घसरण झाली. शुक्रवार, सोमवार व मंगळवार असे सलग तीन दिवस ही घसरण सुरू असून चिनी कंपन्यांना जवळपास 200 अब्ज डॉलर्सहून अधिक फटका बसल्याचा दावा करण्यात येतो. चिनी कंपन्यांची ही घसरण 2008 सालानंतरचा सर्वात मोठा धक्का असल्याचे दिसत आहे. या कंपन्यांमध्ये चीनच्या माहिती तंत्रज्ञान व शिक्षण क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. चिनी कंपन्यांच्या शेअरबाजारातील या घसरणीमागे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने सुरू केलेली कारवाई हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते.
चीनच्या आठ सरकारी कंपन्यांसह सुमारे 250 कंपन्यांनी आतापर्यंत अमेरिकेच्या शेअरबाजारात नोंदणी केली आहे. या नोंदणीमागचा उद्देश अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठ्या प्रमाणात निधी उभा करण्याचा असल्याचे मानले जाते. चिनी कंपन्यांनी आतापर्यंत अशा नोंदणीतून जवळपास दोन ट्रिलियन डॉलर्सचा निधी उभारण्यात यश मिळविले. चिनी कंपन्या मोठ्या प्रमाणावर अमेरिकी शेअरबाजारांमधून निधी उभारीत असल्या तरी गेल्या काही वर्षात अमेरिकी प्रशासनाकडून त्यांच्यावर होणार्या कारवाईचे प्रमाणही वाढले आहे. ट्रम्प प्रशासनाने अनेक चिनी कंपन्यांना ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याबरोबरच विविध प्रकारचे निर्बंधही लादले होते. बायडेन प्रशासनाकडूनही चिनी कंपन्यांविरोधातील कारवाईचे सत्र कायम राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत.