चीनच्या हॅकर्सचा इस्रायलवर सर्वात मोठा सायबर हल्ला

तेल अविव – चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीशी संलग्न असलेल्या हॅकर्सच्या गटाने इस्रायलवर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला चढविला. इस्रायलच्या संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांबरोबर सरकारी कार्यालयांनाही चिनी हॅकर्सनी लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलवर सायबर हल्ले चढविण्यासाठी चिनी हॅकर्सनी आपण ‘इराणी हॅकर्स’ असल्याचा बनाव केल्याचे उघड झाले आहे.

मोठा सायबर हल्ला

सायबर सुरक्षेशी संबंधित ‘फायर आय’ या अमेरिकन कंपनीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, इस्रायलच्या संरक्षण क्षेत्र, सरकारी कार्यालये, तंत्रज्ञान क्षेत्र आणि संपर्क यंत्रणेशी संबंधित कंपन्यांवर सायबर हल्ले झाले. या सायबर हल्ल्यांची सुरुवात दोन वर्षांपूर्वी झाली होती. ‘फायर आय’ने उघडपणे या सायबर हल्ल्यांसाठी चीनला दोषी धरलेले नाही.

पण कंपनीच्याच ‘थ्रेट ऍनालिस्ट’नी या सायबर हल्ल्यांसाठी चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मी आणि गुप्तचर यंत्रणेशी संबंधित हॅकर्सच जबाबदार असल्याचे ठासून सांगितले. कारण चीनच्या हितसंबंधांशी हे सायबर हल्ले जोडलेले होते. त्यामुळे यामागे चिनी हॅकर्स असण्याची शक्यता या विश्‍लेषकांनी वर्तविली. इस्रायली माध्यमांनी फायर आयचा हा अहवाल प्रसिद्ध करून चीनने इस्रायलवर सायबर हल्ले चढवून मोठी चूक केल्याची टीका केली.

आपली ओळख लक्षात येऊ नये, यासाठी चिनी हॅकर्सनी इराणी हॅकर्सचा ट्रेल अर्थात खुणा सोडल्या. तसेच आपापासातील संवादात काही ठिकाणी फारसी भाषेचा जाणूनबुजून वापर केल्याचेही या विश्‍लेषकांनी लक्षात आणून दिले. इस्रायल आणि इराणमधील तणावाचा वापर करण्यासाठी चिनी हॅकर्सनी असा प्रकार केला. याआधीही असे ‘फॉल्स फ्लॅग’ सायबर हल्ले झाल्याचे फायर आयचे विश्‍लेषक जेन्स मोनरॅड यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी चीनच्या हॅकर्सनी अमेरिकेच्या ‘मायक्रोसॉफ्ट’ कंपनीच्या एक्चेंज सर्व्हर्सवर सायबर हल्ले चढविले होते. चीनच्या या सायबर हल्ल्यांची अमेरिकेने गंभीर दखल घेऊन चीनला इशारा दिला होता. ‘चायनीज् स्टेट स्पॉन्सर्ड हॅकर्स’ असे उघड आरोप अमेरिकेने केले होते.

चीनच्या लष्कराने काही वर्षांपूर्वी सुमारे पन्नास हजार ते एक लाख हॅकर्सची स्वतंत्र फौज तयार केली आहे. इतर देशांच्या सरकारी, लष्करी तसेच व्यापारी आणि पायाभूत सुविधांवर सायबर हल्ले चढवून सदर यंत्रणा खिळखिळी करण्याची किंवा माहिती चोरण्याची जबाबदारी चीन या आपल्या सायबर फौजेवर सोपविली आहे. यातील ‘युएनसी २१५’ हा चिनी हॅकर्सचा गट गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे.

‘युएनसी २१५’ या चिनी हॅकर्सच्या गटाने अमेरिका, युरोप तसेच भारतातील सायबर हल्ले चढविल्याचे उघड झाले होते. काही महिन्यांपूर्वी भारताची आर्थिक राजधानी मुंबईच्या वीजसंयंत्रावर झालेल्या सायबर हल्ल्यामागेही चिनी हॅकर्सचा गट असल्याचे आरोप झाले होते. चीनच्या या सायबर हल्ल्यांवर जगभरातून संताप व्यक्त होत आहे. इस्रायलवर सायबर हल्ले चढवून चीनने गंभीर चूक केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक करीत आहेत.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info