बीजिंग/तैपेई/वॉशिंग्टन – अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानमधून घेतलेली माघार व अफगाण सरकारचा पाडाव, या घटना चीनला बळ देणाऱ्या ठरल्या असून चीन कडून तैवान गिळंकृत करण्याच्या तयारीला अधिकच वेग येईल, असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे. त्याचवेळी चीनच्या प्रसारमाध्यमांनीही अफगाणिस्ताचा मुद्दा उचलून तैवानला लक्ष्य केले आहे. सरकारी मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने ‘अफगानिस्तान टुडे, तैवान टुमारो’, अशा शब्दात पुढील काळात अमेरिका तैवानलाही एकटा टाकून पळ काढेल, असे बजावले आहे.
रविवारी तालिबानसमोर शरणागती पत्करून अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असून बहुसंख्य विश्लेषक व तज्ज्ञांनी अमेरिकेच्या निर्णयावर टीकेची झोड उठविली. फ्रेंच विश्लेषक फ्रँकोईस हेसबर्ग यांनी, अमेरिकेच्या धोरणाचे दीर्घकालिन परिणाम होतील, असे बजावले आहे. अमेरिकेवर विश्वास टाकता येणार नाही, ही भावना अफगाणिस्तानमधील घटनांमुळे अधिकच बळावेल याकडेही हेसबर्ग यांनी लक्ष वेधले.
‘अमेरिकेने अफगाणिस्तामध्ये लष्करी तैनातीच्या माध्यमातून सुरक्षेचे वचन दिले होते. तैवानबाबत पुढील पाऊल उचलताना चीन याकडे उपहासाने पहात असेल, यात शंका नाही’, अशा शब्दात स्टुअर्ट लाऊ यांनी अमेरिकेच्या निर्णयाचा समाचार घेतला. लाऊ हे ‘पॉलिटिको’ या वेबसाईटसाठी विश्लेषक म्हणून कार्यरत आहेत. राजकीय विश्लेषक जस्मिन मुजानोविक यांनी अफगाणिस्तान हा जगातील उगवत्या लोकशाहींसाठी धडा ठरेल, असा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी तैवानबरोबरच युक्रेन व कोसोवो या देशांचाही उल्लेख केला.
महासत्तांनी दिलेल्या वचनांना काहीही अर्थ नसतो, असा समज दृढ होण्याची भीतीही मुजानोविक यांनी व्यक्त केली. विश्लेषक अमेरिकेच्या निर्णयाला धारेवर धरीत असतानाच चीनच्या माध्यमांनी तैवानला टोमणे मारण्यास तसेच धमकावण्यास सुरुवात केली आहे. ‘स्ट्रेट हेराल्ड’ या दैनिकाने तैवानने, अमेरिकेवर जास्त विश्वास टाकू नका, अफगाणिस्तानची स्थिती बघा, असा इशारा दिला आहे. ‘चायना अफेअर्स’ या वेबसाईटने, येत्या काळात तैवान क्षेत्रात युद्ध सुरू झाले तर अमेरिका तैवानलाही सोडून पळ काढेल, अशा शब्दात बजावले आहे. अफगाणिस्तानमधील अमेरिकेची माघार तैवानमधील सत्ताधाऱ्यांसाठी धडा असून, त्यांनी अमेरिकेचे प्यादे होणे टाळावे, अशी धमकी ‘ग्लोबल टाईम्स’ या सरकारी मुखपत्राने दिली आहे.
दरम्यान, मंगळवारपासून चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने तैवाननजिकच्या क्षेत्रात ‘लाईव्ह फायर ॲसॉल्ट ड्रिल्स’ सुरू केल्याचे समोर आले आहे. ‘पीएलए’च्या ‘ईस्टर्न थिएटर कमांड’ने तैवाननजिकच्या क्षेत्रात युद्धनौका व लढाऊ विमाने धाडल्याची माहिती लष्करी प्रवक्त्यांनी दिली. अमेरिका व तैवानकडून देण्यात येणाऱ्या चिथावणीच्या पार्श्वभूमीवर हा सराव करण्यात येत असल्याचे चिनी प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |