युरोपिय महासंघ व जी-7च्या बैठकीदरम्यान युक्रेनच्या शहरांवरील रशियाचे हल्ले पाश्चिमात्यांना संदेश देणारे

- विश्लेषकांचा इशारा

किव्ह – युरोपिय महासंघाच्या नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत युक्रेनला महासंघात सहभागी करण्यावर एकमत झाले. याला तीन दिवस उलटत नाही तोच, रशियाने युक्रेनची राजधानी किव्हवर क्षेपणास्त्रांचे जबरदस्त हल्ले चढविले होते. जी-7च्या सदस्यदेशांची बैठक पार पडली व यात रशियाच्या विरोधात युक्रेनला सर्वतोपरी सहाय्य पुरविण्यावर सहमती झाली होती. यानंतर रशियाने युक्रेनच्या क्रेमेन्च्युक शहरावर क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. हे दोन्ही हल्ले चढवून रशियाने अमेरिका व पाश्चिमात्य देशांना सज्जड इशारे दिले आहेत, असे अमेरिका तसेच युरोपिय देशांमधील विश्लेषक बजावत आहेत.

जी-7च्या

युक्रेनमधील युद्ध दिवसागणिक अधिकाधिक उग्ररूप धारण करीत आहे. युक्रेनच्या नाटोमधील सहभागाच्या मुद्यावर सुरू झालेले हे युद्ध संपण्याची शक्यता संपुष्टात येत आहे. स्वीडन आणि फिनलँड हे रशियाच्या प्रभावक्षेत्रातील देश नाटोमध्ये सहभागी होण्याची तयारी करीत असून त्यांना विरोध करणाऱ्या तुर्कीने देखील आपली भूमिका बदलली आहे. तर युक्रेनला युरोपिय महासंघात सहभागी करून घेण्यावर महासंघाच्या नेत्यांचे एकमतझाले आहे. पुढच्या काळात रशियाने युक्रेनवर हल्ले चढवू नये, यासाठी युक्रेन महासंघात सहभागी होण्याची तयारी करीत असल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.

या साऱ्याच्या विरोधात रशियाकडून जहाल प्रतिक्रिया उमटू शकते, हे लक्षात घेऊन अमेरिकेने युरोपात प्रचंड प्रमाणात लष्करी तैनातीची घोषणा केली आहे. याबरोबरच युरोपमधील आपल्या अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा तैनात करून अमेरिक व नाटो रशियाच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी हालचाली करीत आहेत. अशा परिस्थितीत रशियाने युरोपिय महासंघ व जी-7च्या बैठकीदरम्यान युक्रेनची राजधानी किव्ह व क्रेमेंच्युक या शहरांवर क्षेपणास्त्रांचा जबरदस्त मारा केला. पाश्चिमात्यांच्या सामरिक दडपणाची पर्वा रशिया कधीही करणार नाही, उलट त्याला रशियाकडून जबरदस्त प्रत्युत्तर दिले जाईल, असा संदेश रशियाकडून दिला जात आहे.

बेलारूस या शेजारी देशामध्ये अण्वस्त्रांची तैनाती करण्याची तयारी रशियाने केली असून एकेकाळी सोव्हिएत रशियाचा भाग असलेला हा पुन्हा रशियात विलिन करण्याचा इशारा रशियाने दिला आहे. नवे शीतयुद्ध सुरू झाले आहे, असे सांगून बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांनी आपण या युद्धात रशियाच्या बाजूने ठामपणे उभे राहणार असल्याची घोषणा केली. या युद्धात अण्वस्त्रांचा वापर करण्याची वेळ आलीच, तरी रशियाने तसे करताना कचरू नये, असे आवाहन करून राष्ट्राध्यक्ष लुकाशिन्को यांनी युरोपिय देशांना गंभीर परिणामांची जाणीव करून दिली.

तर युरोपिय महासंघाची बैठक व जर्मनीत पार पडलेल्ा जी-7च्या बैठकीदरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर घणाघाती हल्ले चढवून सर्वच पाश्चिमात्य देशांचा अवमान केल्याचा दावा अमेरिकेचे माजी लष्करी अधिकारी बेन हॉजेस यांनी केला आहे. युक्रेनच्या शहरांमधील नागरी वस्त्यांना लक्ष्य करून आपण अमेरिक व युरोपिय देशांची पर्वा करीत नाही, हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी बेदरकारपणे दाखवून दिले, असे हॉजेस यांनी बजावले. तर रशिया व रशियाचे मित्रदेश अमेरिका युक्रेनला पुरवित असलेल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांमुळे हे युद्ध अधिकच भीषण बनेल, असा आरोप करीत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info