राजधानी किव्हवरील क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर युक्रेनच्या दक्षिण व पूर्व भागांमध्ये रशियाचा प्रखर मारा

- ‘पॅट्रिऑट डिफेन्स सिस्टिम’चे नुकसान झाल्याची अमेरिकेची कबुली

मॉस्को/किव्ह – गेल्या काही दिवसांमध्ये युक्रेनकडून बसलेल्या धक्क्यांनंतर रशियन सैन्याने जबरदस्त प्रत्युत्तर देणारे हल्ले चढविले आहेत. सोमवारी रात्री राजधानी किव्हला क्षेपणास्त्र व ड्रोन्सनी लक्ष्य केल्यानंतर मंगळवारी युक्रेनच्या पूर्व तसेच दक्षिणेकडील प्रांतांमध्ये रशियन सैन्याने प्रखर मारा केला. मायकोलेव्ह प्रांतात क्षेपणास्त्रे डागण्यात आली असून डोनेत्स्क, झॅपोरिझिआ व खेर्सनमध्ये रणगाड्यांसह तोफा, रॉकेटस्‌‍ तसेच मॉर्टर्सच्या सहाय्याने हल्ले करण्यात आले. दरम्यान, रशियाने सोमवारी रात्री केलेल्या हल्ल्यांमध्ये राजधानी किव्हमध्ये तैनात असणाऱ्या ‘पॅट्रिऑट मिसाईल डिफेन्स सिस्टिम’चे नुकसान झाल्याची कबुली अमेरिकेने दिली आहे.

गेल्या काही दिवसात युक्रेनने रशियाला एकापाठोपाठ एक असे धक्के दिल्याची माहिती समोर आली होती. राजधानी मॉस्कोसह रशियाच्या विविध प्रांतांमध्ये झालेले ड्रोन हल्ले, रशियाच्या प्रगत लढाऊ विमानांची हानी, वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा बळी व बचावफळीवर झालेले हल्ले यासारख्या घटनांचा त्यात समावेश होता. युक्रेनच्या लष्कराने बाखमतमधील काही भाग ताब्यात मिळविल्याचाही दावा केला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री रशियाने युक्रेनच्या राजधानीवर तब्बल १८ क्षेपणास्त्रे डागली होती.

सोमवारच्या या हल्ल्यानंतर मंगळवारी रशियन सैन्याने युक्रेनमधील इतर प्रांतांना लक्ष्य केले. मंगळवारी रात्री मायकोलेव्ह प्रांताची राजधानी असणाऱ्या शहरावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. यात एका मॉलसह अनेक इमारतींचे नुकसान झाल्याचा दावा युक्रेनच्या यंत्रणांनी केला. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचेही सांगण्यात येते. खेर्सन प्रांतात रशियन रणगाडे व तोफांनी जवळपास ४००हून अधिक हल्ले केल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले. या हल्ल्यात नागरी वस्त्यांना लक्ष्य केल्याचा दावा युक्रेनी अधिकाऱ्यांनी केला.

झॅपोरिझिआ प्रांतातील तब्बल १६ भागांवर तोफा व रॉकेटस्‌‍च्या सहाय्याने मारा करण्यात आला. या क्षेत्रात युक्रेनी लष्कराकडून प्रतिहल्ल्यांसाठी मोठ्या प्रमाणात जमवाजमव सुरू असल्याचे मानले जाते. त्यामुळे रशियाने या प्रांतात वाढविलेले हल्ले महत्त्वाचे ठरतात. डोनेत्स्क प्रांतातील कुराखोव्ह व कॉन्स्टिॲन्टिनिव्हका शहरांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये युक्रेनी लष्कराची जीवितहानी झाल्याचा दावा रशियन लष्कराकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, सोमवारी राजधानी किव्हवर केलेल्या हल्ल्यांमध्ये अमेरिकेच्या ‘पॅट्रिऑट मिसाईल डिफेन्स सिस्टिम’चे नुकसान केल्याचे रशियाने सांगितले होते. मात्र रशियाचा हा दावा युक्रेनी अधिकाऱ्यांनी फेटाळला होता. रशियाची क्षेपणास्त्रे अमेरिकी यंत्रणेचे नुकसान करु शकत नाही, अशी बढाई युक्रेनी अधिकाऱ्यांनी मारली होती. पण अमेरिकी सूत्रांनी पॅट्रिऑटचे नुकसान झाल्याची कबुली दिली आहे. अमेरिकेतील आघाडीची वृत्तवाहिनी असलेल्या ‘सीएनएन’ने यासंदर्भातील वृत्त दिले असून ‘पेंटॅगॉन’ने सदर नुकसानीची चौकशी सुरू केल्याचे म्हटले आहे.

ब्रिटन व नेदरलॅण्डस्‌‍ या देशांनी युक्रेनला लढाऊ विमाने देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे नजिकच्या काळात युक्रेनला ‘एफ-१६’सारखी लढाऊ विमाने मिळतील, असा दावा पाश्चिमात्य माध्यमांनी केला.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info