तेहरान – ‘पाकिस्तानच्या नेत्यांसाठी माझा एक सल्ला आहे. अफगाणिस्तानात जे काही घडेल आणि पुढच्या काळात त्याचा विस्तार होईल, ते लवकरच पाकिस्तानची पकड घेतल्यावाचून राहणार नाही. तालिबानला समर्थन देणार्या पाकिस्तानला याचे गंभीर परिणाम भोगावेच लागतील’, असा इशारा इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदी नेजाद यांनी दिला. त्याचबरोबर, अफगाणिस्तानची सत्ता तालिबानकडे सोपविणे हा पाश्चिमात्य देशांनी पुरस्कृत केलेला सैतानी कटाचा भाग होता, असा आरोप अहमदी नेजाद यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून पंजशीरमधील नॉर्दन अलायन्सविरोधी संघर्षात पाकिस्तानचे लष्कर तालिबानला सहाय्य केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर्स व ड्रोन्स तालिबानविरोधी गटांवर हवाई हल्ले चढविल्याचा दावा केला जातो. यावर इराणमधून आधीच तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. ‘अफगाणिस्तानच्या कारभारात हस्तक्षेपाची धोरणात्मक चूक इतर देशांनी करता कामा नये’, असा इशारा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला होता.
इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदी नेजाद यांनी देखील तालिबानला सहाय्य करणार्या पाकिस्तानला सज्जड इशारा दिला. ‘अफगाणिस्तानच्या शेजारी देशाने तालिबानची निर्मिती करून त्यांना प्रशिक्षित, शस्त्रसज्ज केले’, अशा शब्दात अहमदी नेजाद यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. पण तालिबानला मदत करणार्या पाकिस्तान तसेच इतर देशांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी बजावले. आज जे काही अफगाणिस्तानात घडत आहे, त्याचा विस्तार होईल आणि त्यात पाकिस्तान अडकल्यावाचून राहणार नसल्याचा दावा अहमदी नेजाद यांनी केला.
त्याचबरोबर अफगाणिस्तानची सूत्रे तालिबानच्या हवाली करण्याचा सैतानी कट अमेरिका पुरस्कृत पाश्चिमात्य देशांनी आखला होता. यामध्ये ब्रिटन, रशिया आणि चीन देखील सहभागी असल्याचा आरोप इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी केला. स्वत:च्या हितसंबंधांसाठी या देशांनी अफगाणी जनतेच्या अधिकारांना पायदळी तुडविल्याचा ठपका अहमदी नेजाद यांनी ठेवला.
‘अफगाणिस्तानातील तालिबानच्या या राजवटीचे परिणाम रोखायचे असतील तर पाकिस्तानने भारत आाणि इराणला सहाय्य करावे. अन्यथा तालिबानच्या कारवायांमुळे पाकिस्तानचे सार्वभौमत्व धोक्यात येईल’, असा गंभीर इशारा इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी एका मुलाखतीत दिला.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |