रशियाने डोन्बासपाठोपाठ युक्रेनच्या उत्तर व पश्‍चिमेकडील हल्ले वाढविले

मॉस्को/किव्ह – डोन्बास क्षेत्रातील सेव्हेरोडोनेत्स्कवर बहुतांश ताबा मिळविणाऱ्या रशियन फौजांनी उत्तर, पश्‍चिम तसेच दक्षिण युक्रेनमधील हल्ल्यांची तीव्रता पुन्हा वाढविली आहे. गेल्या 24 तासांमध्ये रशियाने खार्किव्ह, सुमी, लिव्ह, मायकोलेव्ह या शहरांमध्ये क्षेपणास्त्र हल्ले चढविले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सध्या युक्रेनच्या 20 टक्के क्षेत्रावर रशियाचा ताबा असल्याची कबुली दिली आहे.

हल्ले वाढविले

गेल्या महिन्यात मारिपोल शहरावर पूर्ण ताबा मिळविल्यानंतर रशियाने आपले लक्ष डोन्बास क्षेत्रावर केंद्रित केले होते. मारिपोल मोहिमेतून मोकळ्या झालेल्या रशियन फौजा, क्रिमिआत तैनात असलेली लष्करी पथके तसेच रशियन सीमेवर तैनात असणाऱ्या पथकांसह रशियाने डोन्बासवरील हल्ले सुरू केले होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमधील लष्करी कारवाई हाती घेताना डोन्बास क्षेत्राचा विशेष उल्लेख केला होता. त्यामुळे डोन्बासमधील मोहीम रशियन फौजांसाठी सर्वाधिक महत्त्वाची मानली जाते.

हल्ले वाढविले

युक्रेनची राजधानी किव्हसह इतर काही भागांमधून घेतलेली माघार बाजूला ठेवत रशियन फौजांनी सर्वसामर्थ्यानिशी डोन्बासवरील कारवाई सुरू केली होती. त्याला अपेक्षित यश मिळत असल्याचे गेल्या दोन आठवड्यांमध्ये रशियन फौजांना मिळालेल्या यशावरून समोर येत आहे. दर दोन ते तीन दिवसांमागे रशियन फौजा डोन्बासमधील महत्त्वाचे भाग तसेच छोटी शहरे ताब्यात घेत असल्याचे समोर येत आहे. डोन्बासचा भाग असलेल्या लुहान्स्क प्रांताचा 70 दोन तृतियांश भाग रशियाच्या नियंत्रणाखाली आला आहे. सेव्हेरोडोनेत्स्क व लिशिचान्स्कवरील ताब्यानंतर हा प्रांत पूर्णपणे रशियाच्या ताब्यात येईल, असे सांगण्यात येते. लुहान्स्कवरील ताब्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये रशिया डोनेत्स्क प्रांतावरही ताबा मिळवेल, असे संकेत देण्यात येत आहेत.

हल्ले वाढविले

डोन्बासमधील मुसंडीनंतर रशियन फौजांचा आत्मविश्‍वास दुणावल्याचे दिसत असून युक्रेनमधील इतर भागांवर पुन्हा आक्रमक हल्ले सुरू झाले आहेत. दक्षिण युक्रेनमधील मायकोलेव्हवर बुधवारी मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र तसेच रॉकेट हल्ले झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. दक्षिण युक्रेनमधील बंदर व महत्त्वाचा तळ असलेल्या ओडेसावर ताबा मिळविण्यासाठी मायकोलेव्ह हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मायकोलेव्हबरोबरच पश्‍चिम युक्रेनमधील लिव्ह व उत्तर युक्रेनमधील खार्किव्ह तसेच सुमी शहरांवरही क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. स्लोव्हाकियाच्या सीमेला लागून असलेल्या बेस्किड टनेलवर रशियाने क्षेपणास्त्रांचा मारा केल्याची माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यांमध्ये 10हून अधिक जणांचा बळी गेला असून 30 पेक्षा अधिक जखमी झाल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

रशियाला डोन्बासमध्ये मिळत असलेले यश युक्रेनसह समर्थक पाश्‍चिमात्य देशांच्या चिंता वाढविणारी गोष्ट ठरली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी डोन्बासमध्ये युक्रेनी सैन्याची मोठी हानी होत असल्याची कबुली दिली होती. ‘रशियन लष्कराच्या हल्ल्यांमध्ये युक्रेनला दररोज 60 ते 100 जवान गमवावे लागत असून जवळपास 500 जण जखमी होत आहेत. तसेच रशियाने युक्रेनमधील जवळपास 20 टक्क्यांहून अधिक भागावर नियंत्रण मिळविले आहे, ही बाब देखील झेलेन्स्की यांनी मान्य केली आहे.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info