बायडेन प्रशासनाच्या अफगाणिस्तानमधील चुकांमुळे अमेरिकन्सचे रक्त सांडेल

सिनेटर टेड क्रूझ यांची टीका

वॉशिंग्टन/काबुल – राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अफगाणिस्तानच्या मुद्यावर मोठ्या चुका केल्या असून त्यांच्या चुकांमुळे भविष्यात अमेरिकन नागरिकांचे रक्त सांडू शकते, अशी घणाघाती टीका सिनेटर टेड क्रूझ यांनी केली. अफगाणिस्तानमधील माघारीचे समर्थन करताना, अल कायदा संपल्यानंतर त्या देशात सैन्य ठेवण्याची गरज नाही, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले होते. मात्र गेल्या काही दिवसात अल कायदा पुन्हा सक्रिय होण्याचे तसेच दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढल्याचे इशारे सातत्याने देण्यात येत आहेत. सिनेटर क्रूझ यांनी ही भीती व्यक्त करून याला जबाबदार असलेल्या राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर तोफ डागली.

टेड क्रूझ

अफगाणिस्तानमधील माघारीच्या मुद्यावर अमेरिकेच्या संसदेच्या समितीसमोर परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांची सुनावणी झाली. या सुनावणीनंतर बायडेन प्रशासनाच्या ‘अफगाण डिझास्टर’ला लक्ष्य करताना सिनेटर क्रूझ यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. क्रूझ यांनी बायडेन प्रशासनाच्या चार निर्णयांकडे लक्ष वेधले असून हे निर्णय अमेरिकेच्या सुरक्षेच्या दृष्टिने हानिकारक ठरतील, असे बजावले आहे. ‘‘अमेरिकी तसेच अफगाणी नागरिकांची सुटका करण्यापूर्वी ‘बगराम हवाईतळा’चा ताबा सोडणे ही पहिली सर्वात मोठी चूक होती. आजपासून १०० वर्षांनी ही घटना ‘वॉर कॉलेजेस’मध्ये सर्वात मोठी सामरिक घोडचूक म्हणून शिकविली जाईल’’, असा दावा क्रूझ यांनी केला.

टेड क्रूझ

बायडेन प्रशासनाने हजारो अमेरिकी व अफगाणी नागरिकांना तालिबानच्या ताब्यातील हद्दीत सोडून दिले. इतकेच नाही तर अब्जावधी डॉलर्सचे अमेरिकी संरक्षणसाहित्य तालिबानला बहाल केले. याच शस्त्रांचा वापर करून तालिबान पुढील काळात अमेरिकी नागरिकांचे बळी घेईल, अशी चिंता सिनेटर क्रूझ यांनी व्यक्त केली. अफगाणिस्तानातून सुटका होणार्‍या अमेरिकी तसेच अफगाणी नागरिकांची यादी तालिबानला देण्याचा निर्णय भयंकर होता. त्याचवेळी सुटका झालेल्या अफगाणींमध्ये ‘चाईल्ड ब्राईड्स’ अर्थात अल्पवयीन वधूंचा समावेश असल्याचा तसेच लैंगिक शोषणाच्या घटना घडल्याची माहिती समोर आली असल्याचे क्रूझ म्हणाले.

अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांच्या सुनावणीत त्यांनी या गोष्टी कबुल केल्याचा दावाही सिनेटर क्रूझ यांनी केला. बायडेन प्रशासनाचे हे सर्व निर्णय त्यांची अकार्यक्षमता व भयानक विचारसरणी दाखविणारे आहेत. प्रशासनाच्या या घोडचुकांमुळे दुर्दैवाने भविष्यात अमेरिकी नागरिकांचे रक्त सांडले दिसू शकते, अशी जळजळीत टीका सिनेटर क्रूझ यांनी केली आहे. ‘तालिबानी राजवट ही क्रूर दहशतवाद्यांची असून ते कधीही नागरी समाजाचा भाग असलेल्या देशाचे सरकार बनवू शकत नाहीत. उलट बायडेन प्रशासनाच्या अफगाणिस्तानमधील भयानक चुकांमुळे तालिबान व अल कायदामुळे अमेरिकन्सवर होणार्‍या दहशतवादी हल्ल्याचा धोका आता अधिकच वाढला आहे’, असा इशारा क्रूझ यांनी दिला आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info