तेहरान – ‘इराण व इस्रायलमध्ये युद्ध केव्हाच सुरू झाले आहे. इराणचा अणुकार्यक्रम नष्ट करण्यासाठी इस्रायलने हल्ले चढविले. अणुशास्त्रज्ञांची हत्या घडविली, इराणी जनतेला लक्ष्य केले. हे दुसरेतिसरे काही नसून युद्धच ठरते’, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खातिबझादेह यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर आखातातील सर्व संकटांसाठी इस्रायलच जबाबदार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.
इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी चार दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत बोलताना, आखातातील अस्थैर्यासाठी इराणला जबाबदार धरले होते. तसेच अणुकराराच्या मर्यादा ओलांडणार्या इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी इस्रायल सज्ज असल्याचा इशारा पंतप्रधान बेनेट यांनी दिला होता. यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्रायलला साथ द्यावी, असे आवाहन बेनेट यांनी केले होते. इस्रायलच्या पंतप्रधानांनी आमसभेच्या निमित्ताने इराणवर हल्ल्याचा इशारा दिल्याचा दावा आखाती माध्यमांनी केला होता.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खातिबझादेह यांनी इस्रायली पंतप्रधानांच्या धमक्यांना उत्तर दिले. इराण व इस्रायलमध्ये फार आधीच युद्ध पेटल्याचा दावा खातिबझादेह यांनी केला. यासाठी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी गेल्या दोन वर्षांमधील इस्रायलच्या इराणविरोधी कारवायांचा उल्लेख केला. नातांझ अणुप्रकल्पात झालेला संशयास्पद स्फोट, अणुशास्त्रज्ञ फखरीझदेह यांची झालेली हत्या म्हणजे इस्रायलने इराणविरोधात छेडलेले युद्ध असल्याचे संकेत खातबिझादेह यांनी दिले.
इतकेच नाही तर इस्रायलने व्हिएन्ना येथील अणुकराराबाबतची चर्चा फिस्कटवून पाश्चिमात्य देशांना इराणविरोधात चिथावणी दिली. याद्वारे इराण व पाश्चिमात्य देशांमध्ये युद्ध भडकविण्याचा प्रयत्न इस्रायलने केल्याचा आरोप खातिबझादेह यांनी केला. त्याचबरोबर इराणच्या अणुकार्यक्रमावर प्रश्न उपस्थित करणार्या इस्रायलकडे शेकडो अणुबॉम्ब असल्याचा दावा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केला.
‘इराणने आखातात दहशतवाद पसरविला असा आरोप केला जातो. पण दहशतवाद हा चांगला किंवा वाईट असू शकत नाही. आखातातील सर्व संकटांसाठी इस्रायलच दोषी आहे’, असा ठपका खातिबझादेह यांनी ठेवला.
दरम्यान, इराण व इस्रायलमध्ये छुपे युद्ध पेटल्याचा दावा अमेरिकेच्या वर्तमानपत्राने याआधी केला होता. इराण व इस्रायल पर्शियन आखातापासून भूमध्य समुद्रापर्यंत प्रवास करणार्या परस्परांच्या मालवाहू तसेच इंधनवाहू जहाजांना लक्ष्य करीत आहेत. हे छुपे युद्धच असल्याचे या वर्तमानपत्राने बजावले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |