कॅनबेरा/बीजिंग – कोरोनाची साथ पसरविणार्या विषाणूचा उगम चीनच्या वुहान लॅबमध्येच झाला असून, हे दाखवून देणारे खात्रीलायक पुरावे उपलब्ध आहेत, असा गंभीर आरोप ऑस्ट्रेलियातील पत्रकार शॅरी मार्क्सन यांनी केला. ‘एपोक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत हा दावा करतानाच मार्क्सन यांनी सप्टेंबर २०१९च्या सुमारास कोरोनाव्हायरस लॅबमधून ‘लीक’ झाला व त्यानंतर चीनच्या राजवटीकडून त्यावर पडदा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला, असा ठपका ठेवला. ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’चे चीनच्या लष्कराशी संबंध असल्याचेही ऑस्ट्रेलियन पत्रकार यावेळी म्हणाल्या.
‘सप्टेंबर२०१९च्या मध्यावर वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीला कोरोनाव्हायरस लीक झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर चीनच्या सत्ताधारी राजवटीने त्यावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भातील पुरावे उपलब्ध आहेत’, असे मार्क्सन यांनी मुलाखतीत सांगितले. वुहान लॅबसंदर्भातील अनेक पुरावे आपण आपल्या पुस्तकात दिल्याचेही त्यांनी नमूद केले. सप्टेंबर महिन्यातच इन्स्टिट्यूटमध्ये असणार्या २२ हजार विषाणूंची माहिती अचानक ‘ऑफलाईन’ करण्यात आली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. १२ सप्टेंबर, २०१९ नंतर वुहान लॅबने आपली सुरक्षा भक्कम करण्याचा निर्णय घेतला तसेच अतिरिक्त वैद्यकीय यंत्रणाही खरेदी केल्या, असेही शॅरी मार्क्सन यांनी मुलाखतीत उघड केले.
‘कोरोनाची साथ पसरू लागल्यानंतर चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या वरिष्ठ अधिकारी जनरल चेन वै यांच्याकडे इन्स्टिट्यूटची जबाबदारी देण्यात आली. लॅबशी निगडीत माहिती बाहेर प्रसिद्ध न करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने घाईत ‘बायो-सिक्युरिटी लॉ’ मंजूर करून घेतला. या सर्व बाबी लॅबमधून कोरोनाव्हायरस लीक झाल्याकडे निर्देश करणारे पुरावे ठरतात’, असा दावा ऑस्ट्रेलियन पत्रकारांनी केला.
ऑस्ट्रेलियात शोधपत्रकार म्हणून कार्यरत असणार्या शॅरी मार्क्सन यांचे ‘व्हॉट रिअली हॅप्पन्ड् इन वुहान’ नावाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. कोरोनाच्या साथीची सुरुवात चीनच्या ‘वुहान लॅब’मधूनच झाली याची विस्तृत माहिती देणारे हे एकमेव पुस्तक ठरले आहे. वुहान लॅबसंदर्भातील या दाव्यांवर ऑस्ट्रेलियाच्या वृत्तवाहिनीकडून एक माहितीपटही प्रदर्शित करण्यात आला होता.
२०१९ साली कोरोनाव्हायरसची सुरुवात झाल्यापासून चीनची याबाबतची भूमिका संशयास्पद राहिली आहे. आपल्यावर ठेवण्यात येणारा ठपका टाळण्यासाठी चीनने कोरोनाव्हायरसची माहिती सातत्याने दडपून ठेवली. तसेच त्याचा उगम इतर देशांमध्ये झाल्याचे फुटकळ दावेही केले. त्याचवेळी कोरोना साथीबाबत बोलणार्या चिनी संशोधकांची बोलती बंद करण्यात आली. या वर्षाच्या सुरुवातीला ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ‘वुहान लॅब’चा संबंध नाकारण्यात आला होता. मात्र अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहान लॅबमधूनच झाल्याचा उघड आरोप केला होता.
दरम्यान, चीनमधील साथीची तीव्रता पुन्हा वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. चीनच्या राजवटीचा भाग असलेल्या ‘स्टेट कौन्सिल’ने प्रांतिक प्रशासनांना उद्देशून दोन नोटिस जारी केल्या असून, त्यावर ‘एक्स्ट्रॉ अर्जंट’ असा उल्लेखही आहे. यात कोरोनाच्या साथीविरोधात आपत्कालिन प्रतिसाद देण्यासाठी हालचाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात तातडीने अतिरिक्त ‘क्वारंटाईन रुम्स’ उभारण्याचे आदेशही आहेत. फुजिआनसारख्या प्रांतात अशा सुविधा उभारण्यासाठी हालचाली सुरु असल्याची माहितीही समोर आली आहे.
त्याव्यतिरिक्त कोरोनाची साथ पसरल्यास पोलिस व कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांचा समावेश असलेली ‘कंट्रोल सिस्टिम’ उभारण्याचा उल्लेखही नोटिसमध्ये करण्यात आला आहे. ‘एपोक टाईम्स’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
चीनमध्ये गेल्या काही महिन्यात विविध प्रांत तसेच शहरांमध्ये कोरोनाच्या साथीचा उद्रेक झाल्याची माहिती समोर आली होती. हा उद्रेक रोखण्यासाठी चीनने संबंधित भागांमध्ये तातडीने ‘लॉकडाऊन’ची अंमलबजावणी केली होती. मात्र त्यानंतरही साथ पसरण्याच्या घटना सुरु असल्याचे नव्या वृत्तातून समोर येत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |