वॉशिंग्टन – ‘अमेरिका व युरोपिय देश इराणबरोबरचा २०१५ सालचा अणुकरार पुनर्जिवित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण इराणने आपल्या अणुकार्यक्रमाचा वेग वाढविल्यामुळे जगाला अतिशय धोकादायक ठिकाणी आणून ठेवले आहे’, असा इशारा सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल बिन फरहान यांनी दिला. काही तासांपूर्वी इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांनी देखील इराणवर कोणत्याही क्षणी कारवाई करण्याचा इस्रायलला पूर्ण अधिकार असल्याचे जाहीर केले होते.
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी अमेरिक व युरोपिय देशांबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटीकडे पाठ फिरविल्याचा दावा केला जातो. नोव्हेंबर महिन्यात या चर्चेत सहभागी होणार असल्याचे इराणने जाहीर केले आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये इराणने आपल्या अणुकार्यक्रमाबाबत जाहीर केलेली माहिती आंतरराष्ट्रीय समुदायाच्या चिंतेचा विषय ठरली आहे.
या टप्प्यावर येऊन पाश्चिमात्य देश इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत अपयशी ठरू शकत नसल्याची प्रतिक्रिया युरोपिय महासंघाने दिली. २०१५ सालच्या अणुकरारात इराणला पुन्हा सहभागी करून घ्यावेच लागेल, असे महासंघाचे म्हणणे आहे. तर इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत इस्रायल देखील आक्रमक झाल्याचे दोन दिवसांपूर्वी परराष्ट्रमंत्री लॅपिड यांच्या अमेरिका भेटीतून स्पष्ट झाले.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत लॅपिड यांनी इराणवर कारवाईचे संकेत दिले होते. यावेळी युएईचे परराष्ट्रमंत्री देखील उपस्थित होते. याला काही तास उलटत नाही तोच सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल बिन फरहान यांनी देखील अमेरिकेचा दौरा करुन ब्लिंकन यांची भेट घेतली. सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणबाबत आक्रमक भूमिका स्वीकारली.
अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने व्हिएन्ना येथे इराणबरोबर सुरू केलेल्या वाटाघाटींचा उल्लेख प्रिन्स फैझल यांनी केला. या वाटाघाटींद्वारे पाश्चिमात्य देश इराणला २०१५ सालच्या अणुकरारात नव्याने सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण इराण आपल्या आण्विक हालचालींनी जागतिक सुरक्षेला धोका निर्माण करीत असल्याची टीका प्रिन्स फैझल यांनी केली. त्याचबरोबर सौदीने इराणबरोबर चर्चा सुरू केली असून यातून काहीही निष्पन्न झाले नसल्याचे सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |