जेरूसलेम/न्यूयॉर्क – इराणच्या अणुकार्यक्रमावर हल्ल्याची तयारी करण्यासाठी इस्रायलने १.५ अब्ज डॉलर्सची अतिरिक्त तरतूद केली आहे. याचा वापर लढाऊ विमाने, टेहळणी ड्रोन्स तसेच काही महत्त्वाच्या शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी करण्यात येईल, असा दावा केला जातो. इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी या अतिरिक्त तरतूदीचे समर्थन केल्यामुळे इस्रायल इराणवर हल्ल्याची तयारी करीत असल्याचे उघडपणे दिसू लागले आहे. दरम्यान, इराणच्या हवाईदलाने गुरुवारपासून देशव्यापी हवाई सराव सुरू केला आहे. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्या सरकारने काही दिवसांपूर्वी देशाच्या संरक्षणखर्चात अतिरिक्त तरतूदीची घोषणा केली होती. याबाबत इस्रायली संसदेच्या परराष्ट्र व संरक्षण समितीसमोरील सुनावणीत बोलताना संरक्षणमंत्री गांत्झ यांनी इस्रायलसमोरील आव्हानांची माहिती दिली. इस्रायलला अनेक आघाड्यांवर लष्करी आव्हानाला सामोरे जावे लागत असून इराण आणि इराणच्या अणुकार्यक्रमापासून इस्रायलला सर्वात मोठा धोका असल्याचे गांत्झ म्हणाले.
‘इराण अधिकाधिक अणुबॉम्बनिर्मितीच्या जवळ पोहोचत असून इराणला रोखण्यासाठी इस्रायल सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यासाठी इस्रायल आपल्या आक्रमक आणि बचावात्मक सामर्थ्य वाढविण्यासाठी गुंतवणूक करीत आहे. तसेच तंत्रज्ञानविषयक आघाडीसाठी प्रयत्न करीत आहे’, असे गांत्झ यांनी सांगितले. ही माहिती दिली असली तरी १.५ अब्ज डॉलर्सच्या या अतिरिक्त तरतूदीचा वापर कसा केला जाईल, याचे तपशील इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी दिले नाहीत.
पण इस्रायल लढाऊ विमाने, टेहळणी ड्रोन्स आणि भूअंतर्गत प्रकल्पांना लक्ष्य करणार्या बॉम्बची खरेदी करू शकतो, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने जिबीयू-७२ बंकर बस्टर बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली होती. इराणच्या डोंगरात दडलेल्या फोर्दो अणुप्रकल्पावर हल्ला चढविण्यासाठी या बंकर बस्टर बॉम्बचा वापर होऊ शकतो. त्यामुळे इस्रायल या बॉम्बची खरेदी करील, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.
पंतप्रधान बेनेट यांचे सरकार इराणबाबत अधिकाधिक आक्रमक भूमिका घेत असल्याचे गेल्या महिन्याभरातील घडामोडीतून समोर येत आहे. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांनी आपल्या गेल्या आठवड्याच्या अमेरिका भेटीतही इराणबाबत इशारा दिला होता. इराणला अणुबॉम्बच्या निर्मितीपासून रोखण्यासाठी अमेरिकेने वाटाघाटींव्यतिरिक्त इतर पर्यायांचा वापर करावा, असे लॅपिड यांनी सुचविले होते. तर त्याआधी पंतप्रधान बेनेट यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याबरोबरच्या भेटीतही ‘प्लॅन बी’चा उल्लेख केला होता. इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख लेफ्टनंट जनरल अविव कोशावी यांनी देखील इराणच्या अणुकार्यक्रमावर हल्ला चढविण्यासाठीची जोरदार हालचाली सुरू केल्याचे म्हटले होते.
इस्रायलमधून ही बातमी येत असतानाच, इराणमध्ये गुरुवारपासून वार्षिक हवाई सराव सुरू झाला. यामध्ये १२ हवाईतळांनी सहभाग घेतला आहे. या सरावात इराणच्या हवाईदलातील लढाऊ, बॉम्बर्स तसेच टेहळणी विमाने सामील झाली आहेत. तर संयुक्त राष्ट्रसंघातील इराणचे राजदूत माजिद तख्त रवांची यांनी राष्ट्रसंघाकडे इस्रायलची तक्रार केली आहे. इराणच्या अणुकार्यक्रमाला इस्रायलकडून असलेल्या धोक्याची संयुक्त राष्ट्रसंघाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी रवांची यांनी केली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |