अफगाणिस्तानातील आयएसचे दहशतवादी सहा महिन्यात अमेरिकेवर हल्ला चढवतील

पेंटॅगॉनच्या वरिष्ठ अधिकार्‍याचा इशारा

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील ‘आयएस-खोरासन’पासून अमेरिकेच्या सुरक्षेला धोका आहे. पुढच्या सहा महिन्यात आयएसचे दहशतवादी अमेरिकेवर हल्ला चढवू शकतील. तालिबानशी सहकार्य असलेले अल कायदाचे दहशतवादी वर्षभरात अमेरिकेच्या हितसंबंधाना लक्ष्य करू शकतात, असा गंभीर इशारा अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे उपमंत्री कॉलिन कॅल यांनी दिला. त्याचबरोबर तालिबानमध्ये आयएसविरोधात लढण्याची क्षमता आहे का, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे कॅल पुढे म्हणाले. अफगाणिस्तानातून संपूर्ण सैन्यमाघार घेऊन बायडेन प्रशासनाने हा देश दहशतवाद्यांच्या हाती सोपविला व यामुळे अमेरिका असुरक्षित बनलेली आहे, अशी टीका होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कॅल यांनी केलेले हे दावे बायडेन प्रशासनावरील दबाव अधिकच वाढविणारे ठरतात.

आयएसचे दहशतवादी

अमेरिकेवर ९/११चा दहशतवादी हल्ला चढविणार्‍या अल कायदाला संपविल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अफगाणिस्तानातील सैन्यमाघारीचे समर्थन केले होते. तर अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख मार्क मिले यांनी देखील अफगाणिस्तानातून दहशतवादी हल्ल्याचा धोका फारच कमी असल्याचा दावा केला होता. ९/११च्या तुलनेत हा धोका फार गंभीर नसल्याचे जनरल मिले म्हणाले होते. पण पेंटॅगॉनच्या संरक्षण धोरणांचे उपमंत्री कॉलिन कॅल यांनी दिलेली माहिती या दाव्यांना छेद देणारी आहे.

‘आयएस-खोरासन आणि अल कायदाकडे अफगाणिस्तानबाहेर अमेरिका व अमेरिकेच्या हितसंबंधांवर हल्ले चढविण्याचा इरादा असल्याचे ठोस पुरावे आमच्याकडे आहेत’, असे कॅल यांनी सिनेटच्या आर्म्ड् सर्व्हिसेस कमिटीसमोरील सुनावणीत स्पष्ट केले. आयएस-खोरासनचे दहशतवादी सहा ते बारा महिन्यांमध्ये तर अल कायदाचे दहशतवादी एक ते दोन वर्षात अमेरिकेवर हल्ले चढवू शकतात, असा दावा कॅल यांनी केला. अफगाणिस्तानात राजवट प्रस्थापित करणार्‍या तालिबानच्या क्षमतेवर पेंटॅगॉनच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रश्‍न उपस्थित केले.

आयएसचे दहशतवादी

तालिबान आणि आयएस एकमेकांचे कट्टर वैरी आहेत. त्यामुळे आयएसविरोधात कारवाई करण्यासाठी तालिबानचे दहशतवादी तयार आहेत. पण त्यांच्याकडे तशी क्षमता आहे की नाही, हे सांगता येणार नसल्याचे कॅल म्हणाले. तर तालिबान आणि अल कायदामधील सहकार्यावरही कॅल यांनी चिंता व्यक्त केली. अमेरिकेवर हल्ला चढविण्यासाठी अल कायदाला एक ते दोन वर्षे लागू शकतात, पण त्याआधी आयएस आणि अल कायदावर कारवाई करणे आवश्यक असल्याचे संकेत कॅल यांनी दिले.

त्याचबरोबर अजूनही अफगाणिस्तान अमेरिकेचे ४३९ नागरिक अडकल्याची कबुली कॅल यांनी सिनेटसमोर दिली. अफगाणिस्तानात अडकलेल्या अमेरिकी नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याचा दावा बायडेन प्रशासनाने केला होता. पण कॅल यांची माहिती बायडेन प्रशासनावर नव्या टीकेला आमंत्रण देणारी ठरते.

दरम्यान, अल कायदावरील कारवाईसाठी तालिबानने अमेरिकेला दिलेला नकार म्हणजे युद्धाची घोषणा ठरते, असे अमेरिकेचे वरिष्ठ सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी काही तासांपूर्वीच म्हटले होते. तर अल कायदाचा प्रमुख अयमन अल-जवाहिरी हा अफगाणिस्तानात असल्याची शक्यता अमेरिकेचे माजी दूत खलिलझाद यांनी व्यक्त केली होती. अल कायदाचा धोका संपविण्यासाठी अमेरिका अफगाणिस्तानात हवाई हल्ले चढविणार का? असा प्रश्‍न बायडेन प्रशासनाला सातत्याने विचारला जात आहे.

यावर प्रतिक्रिया देताना, अमेरिका पाकिस्तानच्या हवाईहद्दीचा वापर करून अफगाणिस्तानात ड्रोनद्वारे टेहळणी करीत असल्याचे कॅल यांनी सांगितले. पाकिस्तानने यापुढेही हवाईहद्द खुली ठेवावी, असा संदेश अमेरिकेने पाकिस्तानला दिल्याचे कॅल म्हणाले.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info