रशियाने युक्रेनमधील अमेरिकी रॉकेट यंत्रणा उद्ध्वस्त केल्या

रॉकेट यंत्रणा

वॉशिंग्टन/मॉस्को/किव्ह – पाश्चिमात्य देश युक्रेनचे शस्त्रसहाय्य वाढविण्याचे संकेत देत असतानाच रशियाने युक्रेनमधील संरक्षणयंत्रणांवर प्रभावी हल्ले चढविल्याचे समोर आले. गेल्या दोन आठवड्यांमध्ये अमेरिकेने युक्रेनला दिलेल्या चार ‘हायमार्स’ रॉकेट यंत्रणा रशियाने उद्ध्वस्त केल्या आहेत. त्याचवेळी रशियाकडून ‘एअर डिफेन्स मिसाईल्स’चा वापर वाढविण्यात आल्याची माहिती ब्रिटीश गुप्तचर यंत्रणांनी दिली. दरम्यान, युक्रेनने झॅपोरिझिआमधील अणुप्रकल्पावर धोकादायकरित्या ड्रोन हल्ले केल्याचा आरोप रशियाने केला आहे.

रशियाने युक्रेनविरोधात सुरू केलेल्या लष्करी मोहिमेला चार महिन्यांहून अधिक कालावधी उलटला आहे. या काळात रशियाने डोन्बास क्षेत्र तसेच दक्षिण युक्रेनमध्ये चांगले यश मिळविले असून त्याची व्याप्ती वाढविण्याचे संकेत रशियन नेतृत्त्वाने दिले आहेत. रशियाची ही आगेकूच रोखण्यासाठी युक्रेनकडून प्रतिहल्ल्यांची योजना आखण्यात आली आहे. मात्र गेल्या चार महिन्यात झालेल्या प्रचंड हानीमुळे युक्रेन लष्कराला परदेशी शस्त्रसाठ्यावर अवलंबून रहावे लागत आहे.

रॉकेट यंत्रणा

अमेरिका, युरोपिय देश व ऑस्ट्रेलियाने युक्रेनला आतापर्यंत जवळपास 10 अब्ज डॉलर्सचे संरक्षणसहाय्य पुरविले असून त्यात आता लढाऊ विमानांचीही भर पडण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून युक्रेनला ‘ए-10 वॉरथॉग’ विमाने देण्याची तयारी सुरू झाली आहे. ही लढाऊ विमाने प्रभावी हवाई हल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहेत. यापूर्वीही अमेरिकेने युक्रेनला या विमानांचा प्रस्ताव दिला होता. मात्र युक्रेनने अमेरिकेकडे ‘एफ-15′ व ‘एफ-16’सारख्या लढाऊ विमानांची मागणी केली होती.

रॉकेट यंत्रणा

मात्र पाश्चिमात्यांकडून मिळणाऱ्या या शस्त्रास्त्रांनाच रशियाने लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेकडून युक्रेनला देण्यात आलेल्या ‘हायमार्स सिस्टिम्स’पैकी चार यंत्रणा अवघ्या 15 दिवसांमध्ये उडवून दिल्याची माहिती रशियन संरक्षण विभागाने दिली. डोन्बास क्षेत्रात सुरू असलेल्या संघर्षात या यंत्रणा नष्ट केल्याचे रशियाच्या संरक्षण विभागाने स्पष्ट केले. यापूर्वी अमेरिकेसह इतर देशांनी दिलेल्या तोफा तसेच रॉकेटस्‌‍चे साठे उद्ध्वस्त केल्याचेही रशियाने सांगितले होते.

दरम्यान, युक्रेनने झॅपोरिझिआ प्रांतातील अणुप्रकल्पावर धोकादायकरित्या हल्ला चढविल्याचा आरोप रशियाने केला. युक्रेनच्या ड्रोन्सनी 18 व 20 जुलैला अणुप्रकल्पातील विविध भागांवर हल्ले केल्याचे रशियाकडून सांगण्यात आले. याचे फोटोग्राफ्स रशियाने प्रसिद्ध केले आहेत. एक हल्ला अणुप्रकल्पातील ‘कुलिंग प्लँट’नजिक झाला असून यामुळे मोठी आपत्ती थोडक्यात टळल्याचे रशियाने स्पष्ट केले. तर रशियाने अणुप्रकल्पात हेवी वेपनरी तैनात केली होती, असा दावा युक्रेनने केला आहे.

English   हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info