वॉशिंग्टन/मॉस्को – रशियाने सोमवारी क्षेपणास्त्र प्रक्षेपित करून अंतराळातील आपलाच निकामी उपग्रह उडवून दिला. यावर आंतरराष्ट्रीय स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. रशियाची ही चाचणी बेजबाबदार आणि धोकादायक असून अमेरिका यापुढे अशा चाचण्या खपवून घेणार नसल्याचा इशारा अमेरिकेने दिला. तर रशियाला अंतराळाची सुरक्षेबाबत काहीच देणेघेणे नसल्याचे या चाचणीतून स्पष्ट होते, अशी टीका ब्रिटनने केली आहे.
रशियाच्या लष्कराने सोमवारी सकाळी क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन ‘सेलिना-डी’ या उपग्रहाच्या ठिकर्या उडवल्या. १९८२ सालापासून अंतराळात असलेला हा उपग्रह निकामी झाला होता, अशी माहिती रशियाच्या लष्कराने मंगळवारी प्रसिद्ध केली. पण ही चाचणी घेऊन रशियाने आपली बेपर्वाई दाखवून दिल्याची टीका अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. रशियाची उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणी विध्वंसक होती, असा आरोप अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.
‘या चाचणीमुळे माग काढता येण्याजोगे कक्षीय कचर्याचे १,५०० तुकडे आणि त्याहून कमी आकाराच्या लाखो तुकड्यांमुळे सदर कक्षेतून भ्रमण करणार्या सर्व देशांच्या उपग्रहांना धोका निर्माण झाला आहे’, असा इशारा प्राईस यांनी दिला. त्याचबरोबर अंतराळाच्या सशस्त्रीकरणाला विरोध करणार्या रशियाचे दावे अप्रामाणिक आणि ढोंगी असल्याचा ठपका अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी ठेवला. तसेच या बेजबाबदार कारवाईवर अमेरिका आपल्या मित्र आणि सहकारी देशांबरोबर चर्चा करणार असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.
ब्रिटन आणि नाटोने देखील रशियाच्या क्षेपणास्त्र चाचणीवर ताशेरे ओढले. यामुळे निर्माण झालेला कचरा पुढील काही वर्षे इतर देशांची उपग्रहे आणि मानवी अंतराळ उड्डाणांसाठी धोकादायक ठरतील, अशी टीका ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी केली. तर रशियाने या चाचणीतून बेजबाबदारपणा दाखवून दिल्याचे नाटोचे प्रमुख जेन स्टोल्टनबर्ग यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या चाचणीमुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थेत काम करणार्या अमेरिका, जर्मन त्याचबरोबर रशियन अंतराळवीरांची सुरक्षा धोक्यात आल्याचा आरोप होत आहे. पण रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी आपल्यावरील हे आरोप फेटाळले.
रशियाने क्षेपणास्त्र प्रक्षेपित करून अंतराळातील आपला निकामी उपग्रह भेदण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी २०१५ व २०१६ साली रशियाने उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. तर २०१८ साली उपग्रहभेदी क्षेपणास्त्राने सज्ज असलेल्या रशियाच्या मिग-३१ लढाऊ विमानाचे फोटोग्राफ्स माध्यमांमध्ये व्हायरल झाले होते. २०२० साली रशियाने दोन वेळा उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती.
रशियासह, चीन, अमेरिका व भारत या जगातील चार देशांनी उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. यापैकी २००७ साली चीनने घेतलेली उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी टीकेचा विषय ठरली होती.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |