बीजिंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून सुरू असलेल्या उघुरवंशियांच्या वंशसंहाराचे नवे पुरावे समोर आले आहेत. चीनमधील ‘गुआन गुआन’ नावाच्या एका कार्यकर्त्याने आठ शहरांमधील १८ छळछावण्यांचे चित्रिकरण करून त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात काही नव्याने उभारण्यात आलेल्या छळछावण्यांचाही समावेश आहे. व्हिडिओमध्ये छावण्यांसाठी उभारलेल्या उंच भिंती, इमारती, वॉच टॉवर्स तसेच सुरक्षारक्षक दिसून आले आहेत. या नव्या व्हिडिओमुळे उधुरवंशियांवर अत्याचारांच्या मुद्यावर चीन अधिक अडचणीत येऊ शकतो, असे सांगण्यात येते.
‘गुआन गुआन’ हा चीनमधील तरुण असून तैवानमध्ये शिकत असल्याचे सांगण्यात येते. काही वर्षांपूर्वी पर्यटक म्हणून त्याने चीनच्या झिंजिआंग प्रांतात प्रवास केला होता. त्यानंतर एका परदेशी वेबसाईटवर झिंजिआंगमधील उघुरांच्या छावण्यांसंदर्भातील लेख त्याच्या वाचनात आला होता. या लेखात सॅटेलाईट मॅप्सचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध करण्यात आले होते. लेखात प्रसिद्ध झालेल्या नकाशांच्या फोटोनुसार, छावण्या नक्की आहेत का व त्या कशा दिसतात याचा अभ्यास करण्यासाठी २०२० साली परत झिंजिआंगला भेट दिल्याचे गुआनने म्हटले आहे.
गाडी तसेच पाठीवरील बॅगेत लपविलेल्या कॅमेर्याच्या सहाय्याने छावण्यांचे चित्रण करण्यात आल्याची माहिती गुआनने दिली. चित्रिकरण करण्यात आलेल्या छावण्यांमध्ये झिंजिआंगची राजधानी उरुम्कीसह कुमुल, मोरी, फुकांग, कोर्ला व युंकीमधील छळछावण्यांचा समावेश आहे. पर्यटक म्हणून फिरताना स्थानिक नागरिकांनी छावण्यांमध्ये जबरदस्तीने पाठविण्यात येत असल्याचे सांगितल्याचेही गुआनने व्हिडिओत म्हटले आहे. उरुम्कीमधील छावण्यांवर ‘रिफॉर्म थू्र लेबर, कल्चरल रिफॉर्म’ असे लिहिलेले फलकही आढळले आहेत. चीनच्या राजवटीकडून सुरू असलेल्या उघुरवंशियांचा छळ कल्पनेहून अधिक भयानक असल्याचा दावाही गुआनने केला.
गुआनच्या व्हिडिओला ‘यू ट्युब’वर प्रचंड प्रतिसाद मिळाला असून लाखोंनी व्हिडिओ बघून तो शेअर केला आहे. परदेशात सक्रिय असणार्या उघुरवंशिय गट तसेच कार्यकर्त्यांनी सदर व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यासही सुरुवात केली आहे. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही याची दखल घेण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे पडसाद उमटतील, असा दावा विश्लेषकांनी केला आहे.
काही वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या एका अहवालातून चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने तब्बल ११ लाखांहून अधिक उघुरवंशियांना छळछावण्यांमध्ये डांबल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने आक्रमकरित्या उघुरवंशियांचा मुद्दा उचलून धरला असून चीनला सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. अमेरिकेने उघुरवंशियांवर होणारे अत्याचार वंशसंहार असल्याची भूमिका घेतली असून इतर देशांनीही त्याचे अनुकरण करण्यास सुरुवात केली आहे. या वंशसंहारावरून पुढील वर्षी चीनमध्ये होणार्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांवर बहिष्कार टाकावा अशी मागणीही जोर पकडत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |