ओमिक्रॉन व्हेरिअंट जागतिक स्तरावर फैलावण्याचा धोका वाढला

- ‘डब्ल्यूएचओ’चा इशारा

ओमिक्रॉन

जीनिव्हा/लंडन – ‘जगाच्या इतिहासात रोगाच्या अनेक साथी आल्या आणि अनेक युद्धेही झाली. पण तरीही दरवेळेस रोगाची साथ व युद्ध लोकांना आश्‍चर्याचा धक्का देते. ओमिक्रॉन व्हेरिअंटचा उगम सध्याची परिस्थिती किती धोकादायक व अनिश्‍चित आहे, हे दाखवतो. येणार्‍या काळात या विषाणूच्या धोक्याविरोधात अधिक सतर्क राहण्याची गरज आहे’, या शब्दात ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’चे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रॉस घेब्रेयेसुस यांनी ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या फैलावाचा धोका वाढल्याचा इशारा दिला. या व्हेरिअंटमुळे जगातील काही भागांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असेही ‘डब्ल्यूएचओ’ने बजावले आहे.

गेल्या आठवड्यात समोर आलेल्या घातक ‘ओमिक्रॉन व्हेरिअंट’च्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी ‘डब्ल्यूएचओ’ने विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीत संघटनेने नव्या व्हेरिअंटबाबत चिंता व्यक्त केली. नव्या ओमिक्रॉन व्हेरिअंटमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘म्युटेशन्स’ झाले असून तो जागतिक स्तरावर फैलावण्याचा धोकाही वाढला आहे, असे ‘डब्ल्यूएचओ’ने बजावले. म्युटेशन्समुळे ओमिक्रॉनचा प्रसार कोरोना साथीची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढविण्याची भीती आहे, असेही आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

ओमिक्रॉन

‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख घेब्रेयेसुस यांनी, नव्या व्हेरिअंटने कोरोनाची साथ संपली नसल्याचे दाखवून दिले आहे असा दावा केला. ‘जग सध्या भीती व दुर्लक्ष यांच्या चक्रात अडकले आहे. आतापर्यंत कष्टाने मिळविलेले यश एका क्षणात नाहीसे होऊ शकते. त्यामुळे कोरोनाची साथ संपविणे हेच आपल्यासमोरील उद्दिष्ट असायला हवे’, असे ‘डब्ल्यूएचओ’च्या प्रमुखांनी स्पष्ट केले. साथींविरोधात लढण्यासाठी नवा करार किती महत्त्वाचा आहे हेदेखील नव्या व्हेरिअंटचा उगम दाखवतो, असेही घेब्रेयेसुस म्हणाले.

ओमिक्रॉन

दरम्यान, ओमिक्रॉन व्हेरिअंटचा प्रसार झालेल्या देशांची संख्या १५ झाली आहे. त्यात दक्षिण आफ्रिका, बोटस्वाना, इस्रायल, हॉंगकॉंग, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्रिटन, नेदरलॅण्डस्, इटली, डेन्मार्क, झेक रिपब्लिक, जर्मनी, ऑस्ट्रिया, फ्रान्स व कॅनडाचा समावेश आहे. अमेरिकेतही या व्हेरिअंटचे रुग्ण असण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून आरोग्य यंत्रणेने नवा अलर्ट जारी केला आहे.

ओमिक्रॅनच्या फैलावानंतर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर आलेल्या निर्बंधांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. बहुतांश देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणार्‍या विमानांवर सरसकट बंदी जाहीर केली आहे. त्यावर दक्षिण आफ्रिकेने नाराजी व्यक्त करून ही बंदी अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. विमान प्रवास तसेच पर्यटन क्षेत्रातील कंपन्यांनी प्रवासावरील निर्बंध हा नवा धक्का ठरेल, असे बजावले आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेचा भाग असलेल्या ‘वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेश’ने पर्यटन क्षेत्राला यावर्षी तब्बल एक ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान होऊ शकते, असा इशारा दिला. कोरोनाच्या साथीमुळे गेल्या वर्षी जागतिक पर्यटन क्षेत्राला सुमारे दोन ट्रिलियन डॉलर्सचा फटका बसला होता, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info