āवॉशिंग्टन/बीजिंग – चीन अटलांटिक महासागर क्षेत्रात लष्करी तळ उभारण्याच्या हालचाली करीत असल्याचा दावा अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. आफ्रिका खंडातील ‘इक्वेटोरिअल गिनी’ या देशात हा तळ बांधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. चीनचे हे प्रयत्न रोखण्यासाठी अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी ऑक्टोबर महिन्यात या देशाला भेटही दिली होती. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या दैनिकाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. चीनचे सरकारी मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने अमेरिकी माध्यमांचा दावा खोडून काढला असून चीनच्या धोक्याचा आभास निर्माण करण्यासाठी सदर वृत्त पसरविण्यात आल्याचा आरोप केला आहे.
गेल्या काही वर्षांपासून चीन जगभरातील आपला प्रभाव वाढविण्यासाठी जोरदार हालचाली करीत आहे. आर्थिक तसेच व्यापारी पातळीवर वर्चस्व मिळवून त्याचा वापर लष्करी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट पावले उचलत आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची ‘बेल्ट ऍण्ड रोड इनिशिएटिव्ह’ ही योजनाही त्याचाच भाग मानला जाते. मोक्याच्या जागी असलेल्या देशांना आर्थिक मदर देऊन प्रकल्प राबवायचे व परतफेडीच्या बदल्यात जागा ताब्यात घ्यायच्या अशा शिकारी अर्थनीतिचा वापर चीनकडून करण्यात येत आहे. आफ्रिका, आशिया तसेच इंडो-पॅसिफिकमधील देशांमध्ये अशा हालचाली सुरू असल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तान, कंबोडिया, श्रीलंका, युएईसह आफ्रिकेतील महत्त्वाच्या बंदरांमध्ये चीनकडून व्यापक प्रकल्प राबविण्यात आले आहेत. यामागे व्यापारी हेतूंबरोबरच लष्करी उद्दिष्टेही असल्याचे मानले जाते. चीनच्या या हालचालींचे अमेरिकी वर्तुळात पडसाद उमटले आहेत. त्यामुळे अमेरिकी प्रशासनाने चीनच्या लष्करी तळांची उभारणी रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आफ्रिकेतील ‘इक्वेटोरिअल गिनी’मध्ये असणार्या ‘बाटा’ या बंदराचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे.
‘बाटा’ हे अटलांटिक सागरी क्षेत्रातील महत्त्वाचे ‘डीप वॉटर पोर्ट’ म्हणून ओळखण्यात येते. गेल्या दशकात चीनच्या ‘चायना रोड ऍण्ड ब्रिज कंपनी’ने त्याचे आधुनिकीकरण करून दिले होते. या बंदरात चीनने काही सुविधा उभारून घेतल्याचेही सांगण्यात येते. त्यामुळे पुढील काळात त्याचा वापर लष्करी तळ म्हणून करण्याची योजना असावी, असा संशय अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या संशयाची दखल घेऊन अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार जो फायनर यांनी ऑक्टोबर महिन्यात ‘इक्वेटोरिअल गिनी’ला भेटही दिली होती. चीनचा तळ उभा राहिल्यास राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिने ही बाब गंभीर ठरेल, अशी समज अमेरिकी अधिकार्यांनी या देशाच्या नेतृत्त्वाला दिल्याचे सांगण्यात येते. सहाय्याची गरज भासल्यास अमेरिका सहकार्य करील, असे आश्वासनही देण्यात आले आहे.
चीनने गेल्या दशकात आफ्रिकेतील जिबौतीमध्ये आपला पहिला ‘ओव्हरसीज मिलिटरी बेस’ उभारला होता. तळ उभारण्यापूर्वी चीनने जिबौती सरकारला मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य पुरविल्याचे समोर आले होते. ‘इक्वेटोरिअल गिनी’मध्येही अशाच स्वरुपाच्या हालचाली सुरू असल्याचा संशय अमेरिकी यंत्रणांनी व्यक्त केला आहे. अमेरिकी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले हे वृत्त चीनचे सरकारी मुखपत्र असणार्या ‘ग्लोबल टाईम्स’ने फेटाळले आहे. चीनमधील तज्ज्ञांचा हवाला देत लष्करी तळासंदर्भातील दावे खरे नसल्याचे सांगण्यात आले आहे. चीनच्या कथित धोक्याचा आभास निर्माण करण्यासाठी अमेरिकेकडून अशा प्रकारची वृत्ते प्रसारित होत असल्याचा आरोप चिनी मुखपत्राने केला आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |