वॉशिंग्टन/मॉस्को – रशियाच्या वाढत्या लष्करी हालचाली व आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पूर्व युरोपातील नाटो सदस्य देशांना अतिरिक्त संरक्षणसहाय्य पुरविण्याचे आश्वासन दिले. गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व पूर्व युरोपिय नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत यासंदर्भात बोलणी झाल्याचा दावा लिथुआनियाच्या सल्लागारांनी केला. पूर्व युरोपिय देशांबरोबरच युक्रेनलाही वाढीव शस्त्रसहाय्य देण्याची ग्वाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिली आहे. अमेरिका व नाटोच्या पूर्व युरोप तसेच युक्रेनमधील हालचालींवर रशियाने यापूर्वीच नाराजी व्यक्त केली असून युक्रेन ही रेड लाईन असल्याचे बजावले होते.
रशियाने युक्रेनच्या सीमेवर एक लाखांहून अधिक जवान तैनात केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. बातम्यांसोबत रशियन तैनातीचे सॅटेलाईट फोटोग्राफ्सही प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे अमेरिका व युरोपिय देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नाटोसह अमेरिकेने रशियाला वारंवार इशारे दिले असून गंभीर परिणामांचीही जाणीव करून दिली आहे. मात्र त्यानंतरही रशियाने कुठल्याही स्वरुपाची माघार घेतल्याचे निदर्शनास आलेले नाही. त्यामुळे आता अमेरिका व नाटोने युरोपातील संरक्षणसज्जतेसाठी वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
याचाच एक भाग म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी गुरुवारी युक्रेन तसेच पूर्व युरोपिय देशांच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. पूर्व युरोपातील नाटोचे सदस्य असलेल्या देशांचा ‘बुखारेस्ट ९’ म्हणून स्वतंत्र गट आहे. या गटात पोलंड, झेक रिपब्लिक, स्लोवाकिया, इस्टोनिया, हंगेरी, लाटविया, लिथुआनिया, रोमानिया व बल्गेरियाचा समावेश आहे. या नेत्यांबरोबर अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी जवळपास पाऊण तास चर्चा केली. या चर्चेत पूर्व युरोपातील देशांची लष्करी क्षमता वाढविण्यासाठी अतिरिक्त सहाय्य पुरविण्याचे आश्वासन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी दिले. लिथुआनियाच्या परराष्ट्र सल्लागार ऍस्टा स्केसगिरिट यांनी ही माहिती दिली.
माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कारकिर्दीत अमेरिकेने पोलंडमध्ये संरक्षणतळ उभारण्याचे संकेत दिले होते. त्याचवेळी रोमानियात ‘मिसाईल डिफेन्स सिस्टिम’ तैनात करण्यात येत असून लिथुआनिया तसेच इस्टोनियामध्ये लष्करी तुकड्या व रणगाडे तैनात करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. पूर्व युरोपिय देशांबरोबरच युक्रेनलाही अतिरिक्त शस्त्रसहाय्य पुरविण्याची तयारी सुरू आहे. यासंदर्भात राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा झाली आहे. त्याचवेळी रशिया व युक्रेनमधील तणाव कमी करण्यासाठी अमेरिका राजनैतिक पातळीवर अधिक सक्रिय होईल, असे संकेतही बायडेन यांनी दिल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.
हा तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक वाटाघाटींच्या प्रस्तावावर राष्ट्राध्यक्ष बायडेन व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात चर्चा झाली होती, अशी महिती व्हाईट हाऊसने दिली आहे.
रशियावर दडपण टाकून युक्रेनची समस्या सुटणार नाही – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन
पॅरिस – रशियावर दडपण आणून युक्रेनची समस्या सुटणार नाही, असे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. त्याचवेळी अमेरिकेने युक्रेन समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले असले तरी त्यामुळे युरोपने यापूर्वी आखलेली चौकट तुटणार नाही, याची जाणीवही फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी करून दिली. युक्रेनच्या मुद्यावर आपण पुढील आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही मॅक्रॉन यांनी यावेळी जाहीर केले.
फ्रान्स पुढील महिन्यात युरोपिय महासंघाचे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. त्यानंतर पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत युरोपला लष्करी व आर्थिकदृष्ट्या अधिक भक्कम करण्याचे उद्दिष्ट फ्रान्सकडून ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन पुढाकार घेत असून युक्रेनबाबत त्यांनी केलेल वक्तव्य त्याचाच भाग दिसत आहे. फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी यापूर्वीही रशियाबरोबरील तणाव कमी करण्यासाठी पुढाकार घेेण्याचे संकेत दिले होते.
इस समाचार के प्रति अपने विचार एवं अभिप्राय व्यक्त करने के लिए नीचे क्लिक करें:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |