कॅनबेरा – ऑस्ट्रेलिया व चीनमधील तणाव अधिकच चिघळत चालला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्र्यांनी एका कार्यक्रमात चीनच्या वर्चस्ववादी कारवायांकडे लक्ष वेधताना त्याची तुलना १९३०च्या दशकातील नाझी जर्मनीशी केली आहे. काही दिवसांपूर्वीच चीनच्या प्रवक्त्यांनी दोन देशांमधील संबंध बिघडण्यासाठी ऑस्ट्रेलियाची मानसिकता जबाबदार असल्याचा ठपका ठेवला होता. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन संरक्षणमंत्र्यांचे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.
‘ऑस्ट्रेलियाच्या सभोवतालच्या क्षेत्रातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गुंतागुंतीची होत चालली आहे. ही दुसर्या महायुद्धानंतरच्या काळातील सर्वात अनिश्चित स्थिती असल्याचे म्हणता येईल. चीनमधील सत्ताधारी राजवटीच्या अधिकार्यांची वक्तव्ये तसेच वर्तन अधिकाधिक बेलगाम व आक्रमक होत चालले आहे. दुसर्यांचे नुकसान करून आपला फायदा करून घेण्याच्या मानसिकतेतून ही गोष्ट घडताना दिसत आहे. भूराजकीय स्थिती १९३०च्या दशकाशी मिळतीजुळती असून चीनचा उदय त्या दशकातील नाझी जर्मनीशी साधर्म्य दाखविणारा आहे’, असा इशारा ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री पीटर डटन यांनी दिला.
बुधवारी ‘अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स इन ऑस्ट्रेलिया’ने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. येत्या काही आठवड्यात ऑस्ट्रेलियाचे संरक्षण तसेच परराष्ट्रमंत्री अमेरिकेचा दौरा करणार आहेत. या दौर्याच्या पार्श्वभूमीवर दोन देशांमधील संबंध व चीनच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ऑस्ट्रेलिया व अमेरिकेची आघाडी आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षणसज्जता या मुद्यावर बोलताना संरक्षणमंत्री डटन यांनी चीनची तुलना नाझी जर्मनीशी केली.
‘चीन गेली अनेक दशके कायदा व नियमांवर आधारलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा फायदा उचलत होता. मात्र आता तोच ही व्यवस्था उधळण्यासाठी कारवाया करीत आहे’, असा गंभीर आरोप ऑस्ट्रेलियन संरक्षणमंत्र्यांनी केला. संरक्षणमंत्री डटन यांच्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित वरिष्ठ अधिकारी असणार्या कॅरोलिन मिलर यांनी चीनची तुलना १९९० पूर्वीच्या रशियन संघराज्याशी केली होती.
चीन हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश म्हणून ओळखण्यात येतो. पण गेल्या दोन वर्षात ऑस्ट्रेलिया व चीनमधील संबंध वेगाने चिघळण्यास सुरुवात झाली आहे. चीनकडून ऑस्ट्रेलियाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रभाव वाढविण्यात आला असून त्या जोरावर हस्तक्षेपही सुरू झाला आहे. हा हस्तक्षेप रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन व सरकारने आक्रमक निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. त्याचवेळी कोरोनाची साथ, ५जी तंत्रज्ञान, साऊथ चायना सी, व्यापारी दडपण, तैवान अशा अनेक मुद्यांवर ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्त्वाकडून ठाम भूमिका घेण्यात येत आहे. संरक्षणमंत्री डटन यांचे वक्तव्यही त्याचाच भाग दिसत आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
![]() |
https://twitter.com/WW3Info |
![]() |
https://www.facebook.com/WW3Info |