टोकिओ – ‘मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनसारख्या देशाने तैवानवर लष्करी हल्ल्याचे धाडस केल्यास, चीनसाठी तो आत्मघात ठरेल’, असा इशारा जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी दिला. त्याचबरोबर तैवान किंवा तैवानच्या लोकशाहीवरील हल्ला म्हणजे जपानसह सर्व लोकशाही देशांसाठी भयंकर आव्हान ठरेल. अशावेळी जपान आणि अमेरिका शांत बसणार नाही, असे माजी पंतप्रधान ऍबे यांनी बजावले. गेल्या दोन आठवड्यांमध्ये जपानच्या माजी पंतप्रधानांनी दुसर्यांदा चीनला धमकावले आहे. चीनच्या सरकारी मुखपत्राने याची दखल घेऊन ऍबे चीनच्या विरोधातील प्रमुख नेते बनू लागल्याचा शेरा मारला आहे.
चीनच्या लढाऊ विमानांच्या तैवानच्या हवाईहद्दीतील घुसखोरी अजूनही सुरू आहे. काही तासांपूर्वी चीनच्या १३ विमानांनी तैवानच्या हद्दीचे उल्लंघन केले होते. यावर आंतरराष्ट्रीय स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या ‘तैवान-अमेरिका-जपान ट्रायलॅटरल इंडो-पॅसिफिक सिक्युरिटी डायलॉग’मध्येही याचे पडसाद उमटले. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे तैवानबाबत चीनच्या आक्रमकतेला लक्ष्य केले.
‘चीनने क्षेत्रीय विस्तार, शेजारी देशांना चिथावणी देणे आणि त्यांच्यावर दादागिरी गजविण्याचे प्रकार थांबवावे. कारण असे सुरू राहिल्यास यामुळे चीन आपलेच नुकसान करून घेईल’, असा सल्ला जपानचे माजी पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी दिला. त्याचबरोबर, ‘आपले क्षेत्रीय वाद सोडविण्यासाठी चीनने लष्करी पयार्याची अजिबात निवड करू नये. त्यापेक्षा चीनचे वरिष्ठ राजकीय नेतृत्व शांततेने चर्चेद्वारे हे वाद सोडविण्याचे शहाणपण दाखवून आपले हितसंबंध जपेल, अशी अपेक्षा आहे’, असे ऍबे यांनी बजावले.
तरीही चीनने तैवानवर हल्ला चढविलाच तर जपान अणि अमेरिका स्वस्थ बसणार नाही, असे संकेत ऍबे यांनी या बैठकीत दिले. तसेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या विधानांचा विपर्यास करू नये, असे आवाहन ऍबे यांनी केले. तर, जपान, अमेरिका आणि तैवान यांनी सर्व क्षेत्रांमध्ये आपली क्षमता वाढविण्यासाठी मोठे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आवाहन ऍबे यांनी केले.
यासाठी सागरी, हवाई, अवकाश आणि सायबर क्षेत्रातील सहकार्याचा उल्लेख जपानच्या माजी पंतप्रधानांनी केला. फक्त संरक्षण क्षेत्रातच नाही तर व्यापारी आघाडीवरही तैवानला आंतरराष्ट्रीय बाजार मिळवून देण्यासाठी जपान आणि अमेरिकेने प्रयत्न करावे, असे ऍबे म्हणाले. काही आठवड्यांपूर्वी ट्रान्स पॅसिफिक देशांमधील व्यापारी सहकार्यात तैवानने घेतलेल्या सहभागाचे ऍबे यांनी स्वागत केले. जपानच्या माजी पंतप्रधानांच्या या इशार्यावर चीनच्या सरकारी मुखपत्राने टीका केली. जपानमधील चीनविरोधी गटाचे ऍबे नेतृत्व करीत असल्याची टीका, ग्लोबल टाईम्स या चिनी मुखपत्राने केली.
दोन आठवड्यापूर्वी देखील ऍबे यांनी ‘तैवानविरोधातील लष्करी साहस हा चीनसाठी आर्थिकदृष्ट्या आत्मघाताचा मार्ग ठरेल, असे बजावले होते. चीनच्या जपान आणि तैवानविरोधातील कारवायांमुळे शांतता आणि युद्ध यातील रेषा धूसर बनत चालल्याची आठवण आंतरराष्ट्रीय समुदायाला करून दिली होती. चीनने जपानच्या राजदूतांना समन्स बजावल्यानंतर, जपानच्या सरकारमध्ये नसलेले आणि अशी चीनविरोधी भूमिका असणारे जपानमध्ये बरेचजण आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांसाठी जपानला जबाबदार धरता येणार नसल्याचे सांगून जपानच्या राजदूतांनी चीन अकारण यावर आगपाखड करीत असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |