बीजिंग – चीनची विमानवाहू युद्धनौका ‘लिओनिंग’ने पॅसिफिक महासागर क्षेत्राचा भाग असणार्या जपान व तैवानमधील सागरी क्षेत्रात सराव केल्याची माहिती समोर आली आहे. जपानच्या संरक्षण विभागाने याला दुजोरा दिला असून चीनच्या विमानवाहू युद्धनौकेसह चार विनाशिका व एक सप्लाय शिप सरावात सहभागी झाली होती. यावेळी चीनच्या लढाऊ विमानांनी सरावात भाग घेतल्याचेही सांगण्यात आले. चीनच्या विमानवाहू युद्धनौकेचा हा सराव चीनच्या संरक्षणदलांची वाढती युद्धक्षमता दाखवून देणारा असल्याचा दावा विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच चीनच्या बॉम्बर्सनी तैवाननजिकच्या भागात खर्या ‘हाय एक्सप्लोझिव्ह एरिअल बॉम्ब्स’ तसेच ‘सी बॉटम माईन्स’चा वापर केल्याची माहिती उघड झाली होती.
चीनच्या वाढत्या विस्तारवादी कारवाया रोखण्यासाठी अमेरिकेने गेल्या काही वर्षांपासून ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रात संरक्षणतैनाती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतानाच त्यात इतर मित्र तसेच भागीदार देशांनाही सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेच्या या ‘इंडो-पॅसिफिक’ आघाडीत ऑस्ट्रेलिया, भारत, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा यासारखे देश सहभागी झाले आहेत. या देशांनी आपल्या युद्धनौका इंडो-पॅसिफिक क्षेत्रात पाठविल्या असून संयुक्त नौदल सरावही पार पडले आहेत. काही दिवसांपूर्वीच जर्मनीच्या युद्धनौकेनेही इंडो-पॅसिफिकसह चीननजिकच्या ‘साऊथ चायना सी’मधून प्रवास केला होता.
अमेरिकेची ही आघाडी चीनच्या सत्ताधारी राजवटीसाठी मोठा अडथळा ठरला आहे. चीनची राजवट सातत्याने या आघाडीतील देशांवर विविध मार्गांनी दडपण आणण्याचे व धमकावण्याचे प्रयत्न करीत आहे. अमेरिका व मित्रदेशांनी तैवानच्या नजिकच्या क्षेत्रातील वावर थांबवावा यासाठी चीनने प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सरावांची संख्या वाढविण्यास सुरुवात केली आहे.
एप्रिल महिन्यातही चीनच्या विमानवाहू युद्धनौकेने जपान व तैवानमधील सागरी क्षेत्रातून गस्त घातली होती. यावेळी जपानच्या सेन्काकू आयलंडजवळ लढाऊ विमान धाडून जपानला इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात, रशिया व चीनच्या नौदलाने ‘सी ऑफ जपान’चा भाग असलेल्या सागरी क्षेत्रात संयुक्त गस्त घातली होती. यावेळी ‘सी ऑफ जपान’च्या मार्गे रशिया व चीनच्या युद्धनौकांनी पॅसिफिक महासागरात प्रवेश केल्याची माहिती दोन्ही देशांनी दिली होती. त्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला चीनच्या विनाशिकेने पॅसिफिक क्षेत्रात, ‘अँटी सबमरिन ड्रिल’ केल्याचे समोर आले होते.
या पार्श्वभूमीवर चीनचा पॅसिफिक महासागरातील नवा सराव लक्ष वेधून घेणारा ठरतो. सरावादरम्यान चीनच्या विमानवाहू युद्धनौकेवर तैनात असलेल्या ‘जे-१५’ या लढाऊ विमानांसह ‘झेड-९’ व ‘झेड-१८’ या हेलिकॉप्टर्सनी आपली क्षमता दाखविणारी प्रात्यक्षिके केल्याचे सांगण्यात येते. या सरावावर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या दोन युद्धनौका रवाना केल्याचे जपानच्या संरक्षण विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, चीनच्या हा सराव सुरू असतानाच इंडो-पॅसिफिक क्षेत्रात ऑस्ट्रेलियानजिक अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा संयुक्त नौदल सराव पार पडल्याची माहिती अमेरिकी नौदलाकडून देण्यात आली आहे.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |