कझाकस्तानमध्ये आणीबाणीची घोषणा

- लष्कराच्या 12 जवानांची निदर्शकांकडून निर्घृण हत्या

– निदर्शकांनी राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाला आग लावली
– रशियाच्या नेतृत्वाखाली ‘सीएसटीओ`चे लष्करी पथक रवाना

नूर सुल्तान – इंधनदराच्या वाढीविरोधात कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांनी हिंसक वळण घेतले. निदर्शकांनी राजधानी नूर सुल्तानमध्ये राष्ट्राध्यक्ष कॅसिम-जोमार्ट तोकायेव यांचे निवासस्थान पेटवून दिले. तर हिंसक जमावाने राजधानी नूर सुल्ताममध्ये 12 जवानांची निर्घृणरित्या हत्या केली. त्याचबरोबर निदर्शकांनी सरकारी इमारती तसेच विमानतळांवर ताबा घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. हा दहशतवादी हल्ला असल्याचा आरोप करून राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी देशात आणीबाणी लागू केली. तसेच तोकायेव यांनी रशियाप्रणित ‘सीएसटीओ`कडे लष्करी सहाय्यासाठी आवाहन केले असून लवकरच शांतीसैनिकांची लष्करी तुकडी नूर सुल्तानमध्ये दाखल होणार आहे.

आणीबाणी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर, गेल्या वर्षी आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या कझाकस्तानच्या सरकारने नववर्षाच्या सुरुवातीला नैसर्गिक इंधनवायूवरील सवलत मागे घेतली होती. कझाकस्तानमध्ये नैसर्गिक वायूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे कझाकस्तानच्या सरकारने आत्तापर्यंत नैसर्गिक वायूच्या वापरावर सवलती दिल्या होत्या. पण कोरोनामुळे देशाच्या तिजोरीवर ताण आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांच्या सरकारने या सवलती काढून घेतल्या.

याविरोधात गेल्या तीन दिवसांपासून राजधानी नूर सुल्तानमध्ये सरकारविरोधात निदर्शने सुरू होती. जवळपास एक हजार जणांच्या सहभागासह शांततेने सुरू झालेल्या या निदर्शनांमध्ये आत्ता हजारो जण सहभागी झाले असून निदर्शकांनी हिंसाचार सुरू केला आहे. निदर्शकांची मागणी मान्य करून राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी आपले मंत्रिमंडळही बरखास्त केले. तसेच इंधनदर आधीपेक्षाही कमी केले जातील, अशी घोषणाही केली. तरी देखील राजधानी नूर सुल्तानसह देशाच्या इतर शहरांमध्ये निदर्शने थांबलेली नाहीत. उलट याची तीव्रता वाढत चालली आहे.

आणीबाणी

गेल्या चोवीस तासात तर निदर्शक अधिकच हिंसक बनले असून राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान तसेच स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाला निदर्शकांनी आग लावली. काही ठिकाणी निदर्शकांनी पोलीस, लष्करावर हल्ले चढविले, तर काही ठिकाणी लष्कराच्या वाहनांना आगी लावल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये 12 जवानांची हत्या झाली. यातील तिघांचा गळा चिरण्यात आल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली. या हिंसाचारात एक हजार जण जखमी झाले आहेत. ‘दहशतवाद्यांच्या गँगने आमच्या जवानांवर हल्ले चढविले आहेत`, असा आरोप राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी केला. या दहशतवाद्यांना परदेशी हस्तकांनी प्रशिक्षित केल्याचा ठपका तोकायेव यांनी ठेवला. त्याचबरोबर कझाकस्तानातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी रशियाला सहाय्याचे आवाहन केले आहे.

रशियाच्या नेतृत्वाखाली संघटीत असलेल्या माजी सोव्हिएत देशांच्या ‘कलेक्टिव्ह सिक्युरिटी ट्रिटी ऑर्गनायझेशन-सीएसटीओ`ने आपले लष्करी पथक रवाना करावे, अशी मागणी राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांनी केली. ‘सीएसटीओ`ने राष्ट्राध्यक्ष तोकायेव यांच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद दिला असून लवकरच रशिया, बेलारूस, आर्मेनिया, किरगिझिस्तान आणि ताजिकिस्तानचे लष्कर शांतीसैनिक म्हणून कझाकस्तानसाठी रवाना होईल, अशी माहिती आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाश्‍नियान यांनी दिली.

आज कझाकस्तानमध्ये अराजक निर्माण करण्याचा जसा प्रयत्न सुरू आहे, तशीच किंवा त्याहून भयंकर स्थिती युरोपिय देशांवर ओढावू शकते, असा इशारा युरोपिय विश्‍लेषक व माध्यमे देत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून युरोपिय देश इंधनाच्या टंचाईचा सामना करीत आहेत. हिवाळ्याच्या काळात नैसर्गिक वायूचा तुटवडा आणि दरवाढीची समस्या युरोपिय देशांना देखील भेडसावत आहे. काही दिवसांपूर्वी पोलंड, हंगेरी, झेक प्रजासत्ताक आणि जर्मनी या देशांमध्ये यावरून निदर्शने झाली होती, याकडे युरोपिय विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. वेळीच इंधनचा प्रश्‍न सोडविला नाही तर युरोपिय देशांमध्ये कझाकस्तानपेक्षाही भीषण अराजक माजेल, असा इशारा युरोपिय विश्‍लेषक देत आहेत.

English  हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info