अबु धाबी विमानतळावर ड्रोन हल्ला

- दोन भारतीयांसह तिघांचा बळी; हौथी बंडखोरांनी जबाबदारी स्वीकारली

अबु धाबी – संयुक्त अरब अमिरात-युएईची राजधानी अबु धाबी येथे झालेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये तिघांचा बळी गेला. यामध्ये दोन भारतीय तर एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे. येमेनमधील हौथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबादारी स्वीकारली तसेच युएईच्या खोलवर हल्ले चढविल्याचा दावा केला. दरम्यान, अबु धाबीमध्ये युएईचे राजघराणे स्थित असून आणि सरकारी आस्थापनांच्या महत्त्वाच्या इमारतीही इथे आहेत. त्यामुळे या हल्ल्याद्वारे हौथी बंडखोरांनी युएईला इशारा दिल्याचे दिसते.

अबु धाबी

सोमवारी सकाळी युएईची राजधानी अबु धाबी भीषण स्फोटाने हादरली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसाफा येथील औद्योगिक क्षेत्रात उभ्या असलेल्या तीन इंधनवाहू टँकरचा स्फोट झाला. ‘अबु धाबी नॅशनल ऑईल कंपनी-एडीएनओसी’च्या इंधन साठ्यापासून काही अंतरावर हा भडका उडाला. तर पुढच्या काही मिनिटांमध्ये अबु धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आवारात सुरू असलेल्या बांधकाम क्षेत्रातही आग भडकली.

यामागील कारण स्पष्ट झाले नसल्याचे युएईच्या सुरक्षा यंत्रणांनी म्हटले होते. पण येमेनमधील हौथी बंडखोरांनी ड्रोनद्वारे हे हल्ले घडविल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पुढच्या काही तासात हौथी बंडखोरांनी अबु धाबीमधील हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली. युएईच्या आत खोलवर हे हल्ले चढविल्याचे हौथी बंडखोरांनी जाहीर केले. लवकरच याबाबतची माहिती उघड करणार असल्याचे हौथी बंडखोरांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

अबु धाबी

या हल्ल्यात तिघांचा बळी गेला असून सहा जण जखमी झाले आहेत. यामध्ये दोन भारतीयांचा समावेश असल्याची माहिती युएईतील भारतीय राजदूत संजय सुधीर यांनी दिली. काही दिवसांपूर्वीच हौथी बंडखोरांनी रेड सीच्या क्षेत्रात केलेल्या कारवाईत सौदी अरेबियासाठी प्रवास करणार्‍या युएईचे मालवाहू जहाज ताब्यात घेतले होते. या जहाजातही सात भारतीय कर्मचारी असल्याची माहिती समोर आल्यानंतर भारताने आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी हौथी बंडखोरांवर दबाव टाकला होता.

दरम्यान, येमेनमधील राष्ट्राध्यक्ष मन्सूर हादी यांच्या सरकारला संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता आणि सौदी, युएई व अरब मित्रदेशांचे समर्थन आहे. तर गेल्या पाच वर्षांपासून या हादी यांच्या सरकारविरोधात संघर्ष पुकारणार्‍या हौथी बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये सौदीने हौथी बंडखोरांना दोन वेळा संघर्षबंदीचा प्रस्ताव दिला. पण हौथी बंडखोरांनी हा प्रस्ताव धुडकावून सौदी व युएईवर हल्ले चढविणार असल्याच्या धमक्या दिल्या होत्या. युएईच्या इंधन साठ्याजवळ आणि विमानतळावर हल्ले चढवून हौथी बंडखोरांनी आपला इशारा प्रत्यक्षात उतरविल्याचे दिसते. पुढच्या काळात हौथी बंडखोरांचे युएई तसेच सौदीवरील हल्ले अधिकच तीव्र होतील, असे संकेत अबू धाबीवरील या हल्ल्यातून मिळत आहेत.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info