मॉस्को/वॉशिंग्टन – पॅसिफिक महासागरात रशियन नौदलाचा सराव सुरू असताना कुरिल आयलंड भागात घुसखोरी करणार्या अमेरिकी पाणबुडीला पिटाळून लावल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला. याप्रकरणी रशियाने अमेरिकेच्या लष्करी प्रतिनिधीला बोलावून संबंधित घटनेची माहिती दिल्याचेही सांगण्यात आले आहे. सध्या युक्रेनच्या मुद्यावरून रशिया व अमेरिकेत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये युक्रेन मुद्यावरून रशिया व पाश्चात्य देशांनी आक्रमक लष्करी हालचाली सुरू केल्या आहेत. रशियाने युक्रेन सीमेसह बेलारुसमध्ये मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात केले आहे. त्याचवेळी रशियाच्या सागरी हद्दीत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात नौदल सराव सुरू करण्यात आले आहेत. पॅसिफिक महासागरातील सरावही याचाच भाग मानला जातो.
रशियन नौदलाचा सराव सुरू असताना ‘आयएल-३८ अँटी सबमरिन एअरक्राफ्ट’ व एका रशियन पाणबुडीने अमेरिकन पाणबुडीच्या हालचाली टिपल्या. अमेरिकेच्या व्हर्जिनिआ क्लासची आण्विक पाणबुडी कुरिल आयलंड भागातील ‘उरुप’ बेटाजवळ गस्त घालत असल्याचे आढळले. याची माहिती रशियाच्या ‘पॅसिफिक फ्लीट’ची विनाशिका ‘मार्शल शापोश्निकोव्ह’ला देण्यात आली. त्यानंतर या विनाशिकेने अमेरिकी पाणबुडीला आपली ओळख पटवून रशियन हद्दीतून बाहेर जाण्यास सांगितले. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने रशियन विनाशिकेने अमेरिकी पाणबुडीचा पाठलाग करुन पिटाळले, अशी माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली.
शुक्रवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या दरम्यान ही घटना घडल्याचे रशियन संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. या घटनेची माहिती मॉस्कोतील अमेरिकी लष्कराच्या प्रतिनिधीलाही देण्यात आली असून सदर घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे. अमेरिकी संरक्षण विभागाने सदर घटना नाकारली आहे. अमेरिकी पाणबुडी रशियाच्या सागरी हद्दीत होती, ही माहिती खरी नसल्याचे अमेरिकी प्रवक्त्याने स्पष्ट केले. मात्र अमेरिकेने पाणबुडीचे नाव व तिच्या मोहिमेसंदर्भात माहिती उघड केलेली नाही.
यापूर्वीही अमेरिकेच्या पाणबुड्या तसेच युद्धनौका रशियन हद्दीनजिक आढळल्याचे दावे रशियाकडून करण्यात आले होते. सध्या युक्रेन मुद्यावरून दोन देशांमधील तणाव चिघळल्याने अमेरिकी पाणबुडीचा रशियन हद्दीनजिकचा प्रवास लक्ष वेधून घेणारा ठरतो.
दरम्यान, शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन तसेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवरून बोलणी केल्याचे समोर आले आहे. फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा झाली. यात पुतिन यांनी युक्रेनवरील हल्ल्यासंदर्भात कोणतेही संकेत दिले नाहीत, अशी माहिती फ्रेंच अधिकार्यांनी दिली.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |