म्युनिक/मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युरोपात १९४५ सालानंतरचे सर्वात मोठे युद्ध भडकविण्याचा कट आखला आहे, असा इशारा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिला. जर्मनीत सुरू असलेल्या ‘म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स’मध्ये बोलताना जॉन्सन यांनी हा इशारा दिला. ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रुस यांनी, युक्रेनवरील आक्रमणानंतर बाल्टिक तसेच बाल्कन देश हे रशियाचे लक्ष्य असेल, असा दावा केला आहे. ब्रिटनच्या या इशार्यांचा पार्श्वभूमीवर शनिवारी राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या देखरेखीखाली रशियात ‘न्यूक्लिअर ड्रिल्स’ पार पडल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही दिवसात अमेरिका व ब्रिटनसह पाश्चात्य देश अधिक आक्रमक झाले असून रशिया कधीही युक्रेनवर आक्रमण करेल, असे इशारे सातत्याने देण्यात येत आहेत. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी, रशियाचे राष्ट्रअध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याचे निश्चित केले आहे, असा दावा केला होता. नाटोचे प्रमुख तसेच जर्मनी, पोलंड व इस्टोनिया यासारख्या देशांच्या नेत्यांकडूनही रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याला कोणत्याही क्षणी सुरुवात होऊ शकते, अशी वक्तव्ये करण्यात आली आहेत. जर्मनीतील ‘म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स’च्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायाकडून रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या शक्यतेचा पुनरुच्चार करण्यात येत आहे.
‘रशियाची युक्रेनवरील आक्रमणाची योजना आधीच सक्रिय झाल्याची चिन्हे दिसत आहेत. युक्रेनची राजधानी किव्हला लक्ष्य करणारा हल्ला चढविण्याची तयारी रशियाने केली आहे. हा हल्ला बेलारुसमधूनही होऊ शकतो. १९४५ सालानंतरचे युरोपातील सर्वात मोठे युद्ध करण्याची रशियाची योजना आहे. यात प्रचंड प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे’, असा इशारा ब्रिटनच्या पंतप्रधानांनी दिला. युक्रेनवर हल्ला चढवून नाटो कमकुवत करु असा रशियन राष्ट्राध्यक्षांचा समज असेल, तर तो चुकीचा आहे, असेही जॉन्सन यांनी यावेळी बजावले.
पंतप्रधान जॉन्सन यांच्यापाठोपाठ ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री ट्रुस यांनी रशियाच्या आक्रमकतेकडे लक्ष वेधले. ‘राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना युक्रेनवर आक्रमणाची संधी दिली तर ते जुन्या रशियन संघराज्याचा भाग असलेल्या इतर शेजारी देशांवरही हल्ले चढवू शकतात. आंतरराष्ट्रीय समुदायाने पुतिन यांना रोखणे गरजेचे आहे, कारण ते युक्रेननंतर थांबणार नाहीत. युक्रेननंतर बाल्टिक तसेच बाल्कन देशांना हल्ल्याचा धोका आहे’, असा दावा ट्रुस यांनी केला.
दरम्यान, ब्रिटनकडून देण्यात आलेल्या या इशार्यांच्या पार्श्वभूमीवरच रशियाने शनिवारी ‘स्ट्रॅटेजिक न्यूक्लिअर एक्सरसाईज’ केल्याचे समोर आले. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या देखरेखीखाली झालेल्या या सरावादरम्यान, रशियन युद्धनौका, पाणबुड्या तसेच लढाऊ विमानांमधून आण्विक क्षमता असणार्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात आली. यात बॅलेस्टिक तसेच क्रूझ क्षेपणास्त्रांबरोबरच हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचाही समावेश होता, असे सांगण्यात येते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |