चीनच्या लेझर हल्ल्याची चौकशी करणे आवश्यक

- ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मागणी

चौकशी

कॅनबेरा/बीजिंग – गेल्या आठवड्यात चीनच्या युद्धनौकेने केलेल्या लेझर हल्ल्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी केली आहे. चीनने केलेला हल्ला हा ऑस्ट्रेलियाला धमकावण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही मॉरिसन यांनी केला असून अशा गोष्टींना ऑस्ट्रेलिया घाबरणार नाही, असे बजावले आहे. हल्ल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या राजकीय वर्तुळात देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला चीनकडून असणार्‍या धोक्यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

चौकशी

गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेस असणार्‍या ‘अराफुरा सी’ भागात गस्त घालणार्‍या ‘पी-८ए पोसायडन’ या टेहळणी विमानावर चीनच्या युद्धनौकेने लेझर हल्ला चढविला. यावेळी चीनच्या युद्धनौकेकडून वापरण्यात आलेला लेझर हा ‘मिलिटरी ग्रेड’ होता, अशी माहिती ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणमंत्र्यांनी दिली आहे. चीनच्या हल्ल्याच्या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाने राजनैतिक पातळीवर तीव्र निषेध नोंदविला आहे. हल्ल्यानंतर जवळपास चार दिवस चीनने सदर घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

चौकशी

सोमवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने, चीनच्या युद्धनौका आंतरराष्ट्रीय नियमांच्या चौकटीत प्रवास करीत होत्या असे स्पष्टीकरण दिले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने चीनबाबत अपप्रचार करणे थांबवावे, असेही बजावले. चीनच्या या वक्तव्यांवर ऑस्ट्रेलियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी घटनेची पूर्ण चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी चीनच्या आक्रमकतेविरोधात ऑस्ट्रेलियाचा निर्धार अधिकच पक्का झाल्याचा इशाराही दिला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या विरोधी पक्षांनीही चीनविरोधात नाराजी व्यक्त केली असून अशा घटनांमुळे चीनविरोधातील असंतोष अधिकच वाढू शकतो, असे म्हटले आहे. ऑस्ट्रेलियात यावर्षी निवडणूक होणार असून चीनच्या कारवाया हा त्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे चीनकडून झालेला लेझरचा हल्ला ऑस्ट्रेलियात राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनल्याचे संकेत मिळत आहेत.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info