संयुक्त राष्ट्रसंघ – युक्रेनवर हल्ला चढविणार्या रशियाविरोधात थेट युद्ध न पुकारता अमेरिका व नाटोने आर्थिक, राजनैतिक तसेच व्यूहरचनात्मकदृष्ट्या रशियाची जबरदस्त कोंडी करणार्या आक्रमक निर्णयांचा सपाटा लावला आहे. युरोपिय महासंघाने युक्रेनला सदस्यत्त्व देण्याची तयारी केली आहे. तर अमेरिका आणि ब्रिटनने रशियाला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतून बाहेर काढण्याचे इशारे दिले आहेत. त्यामुळे युक्रेनच्या युद्धाचे अधिक भीषण परिणाम समोर येऊ लागले असून याचा प्रभाव सार्या जगावर पडणार असल्याचेही स्पष्टपणे दिसत आहे.
रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी किव्हची कोंडी केली असून खारकिव्ह शहरावरील हल्लेही तीव्र केले आहेत. किव्हच्या उपनगरात रशियन सैन्य दाखल झाल्याचे व्हिडिओज् प्रसिद्ध झाले आहेत. रशियन सैन्याने किव्हच्या नागरिकांना सुरक्षेसाठी काही सूचना दिल्या आहेत. यामुळे किव्ह सोडण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. तर खारकिव्हमध्ये रशियाने चढविलेल्या हल्ल्यात युक्रेनी लष्कराबरोबरच जनतेचीही हानी झाल्याचे दिसते आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी हा रशियाचा दहशतवाद असल्याची टीका केली आहे. हे कुणीही विसरणार नाही आणि याला क्षमा नाही, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्षे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
युक्रेनमध्ये रशिया व्हॅक्युम बॉम्ब तसेच क्लस्टर बॉम्बचा वापर केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. पण रशियाने हे आरोप धुडकावले. युरोपिय महासंघाच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्रसंघात रशियावर घणाघाती आरोपांची फैर झाडली. युक्रेनसारख्या छोट्या देशावर रशिया करीत असलेली ही कारवाई अमानवी ठरते. तसे करण्याची मोकळीक रशियाला देता येणार नाही. युरोपिय महासंघ यासाठी युक्रेनला सर्वतोपरी सहाय्य करील. तसेच युरोपिय महासंघाने युक्रेनला सदस्यत्त्व देण्याची तयारीही दाखवली आहे. याबरोबर महासंघाकडून युक्रेनला आर्थिक तसेच इतर पातळ्यांवरील सहाय्य पुरविले जाणार आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युक्रेनला सहाय्याची घोषणा करून रशियाला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याची घोषणा केली. त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी देखील मानवाधिकारांचे उल्लंघन करणार्या रशियाला सुरक्षा परिषदेत राहण्याचा अधिकार नसल्याचे ब्लिंकन पुढे म्हणाले. तसेच उघूरवंशियांच्या मानवाधिकारांचे हनन करणार्या चीनलाही अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष्य केले.
याच्या आधी युरोपिय देशांनी रशियासाठी आपली हवाईहद्द बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच आपल्या देशात रशियन भाषा तसेच रशियन विद्यार्थ्यांनाही लक्ष्य करणारे निर्णय युरोपिय देशांनी घेतले आहेत. याची गंभीर दखल घेऊन रशियाने युरोपिय देशांमधील आपल्या नागरिकांना मायदेशी परतण्याचे आवाहन केले. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी आपल्या देशावरील आरोपांना सणसणीत प्रत्युत्तर दिले.
क्रिमिआ ताब्यात घेतले म्हणून रशियावर टीका करणार्यांना क्रिमियन जनतेवर युक्रेनने केलेल्या अत्याचारांची पर्वा नव्हती. डोंबास भागात युक्रेन मानवाधिकारांची सर्रास पायमल्ली करीत होता, याकडेही पाश्चिमात्यांनी कधीच लक्ष दिले नाही. यामुळे रशियामध्ये निर्वासितांचे लोंढे येत होते व म्हणूनच रशियाला इथे लष्करी हस्तक्षेप करावा लागला, असे सांगून लॅव्हरोव्ह यांनी पाश्चिमात्य देशांवर तोफ डागली. याबरोबरच अमेरिकेने युरोपिय देशांमधील आण्विक तैनाती मागे घ्यावी, अशी मागणी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली. उद्दिष्टे पूर्ण झाल्याखेरीज रशियाची युक्रेनमधील कारवाई थांबणार नाही, असे यावेळी परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी ठासून सांगितले.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |