इराणचा ‘अंडरग्राऊंड’ अणुप्रकल्प शांतीपूर्ण कसा असू शकतो? – इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा सवाल

इराणचा ‘अंडरग्राऊंड’ अणुप्रकल्प शांतीपूर्ण कसा असू शकतो? – इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा सवाल

तेल अविव/कैरो – ‘वैद्यकीय कारणासाठी अणुकार्यक्रम राबवित असल्याचे इराणचे म्हणणे असेल, तर मग तो भूमिगत, गोपनीय का ठेवण्यात आला आहे? अणुऊर्जा आयोगाच्या निरिक्षकांना या अणुप्रकल्पात प्रवेश का नाकारला जातो? याचे कारण इराण गुप्तपणे अण्वस्त्रनिर्मितीच्या प्रयत्नात आहे. यापासून इराणला रोखणे, हे इस्रायलचे ध्येय आहे. आवश्यकता भासलीच तर यासाठी इराणच्या अणुकार्यक्रमावर थेट हल्ला चढविण्याची तयारी इस्रायलने ठेवलेली आहे’, असे इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी बजावले आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री गांत्झ यांनी रविवारी इजिप्तमधील आघाडीच्या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत इराण, अमेरिकेतील बायडेन प्रशासन आणि इस्रायलमधील आगामी निवडणुकींच्या मुद्यांवर गांत्झ यांनी आपली मते मांडली. इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत इस्रायलचे ध्येय अगदी स्पष्ट असल्याचे संरक्षणमंत्री गांत्झ म्हणाले. ‘इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखणे हे फक्त इस्रायलच्या हिताचे नाही तर क्षेत्रीय आणि जागतिक हितासाठी देखील सर्वात महत्त्वाचे ठरते. इराण अण्वस्त्रसज्ज बनला तर आखातात आण्विक स्पर्धा भडकेल’, असा दावा गांत्झ यांनी केला.

‘इराणच्या कट्टरपंथी राजवटीला आपल्या स्वार्थासाठी, आखातावर वर्चस्व गाजविण्यासाठी आण्विक क्षमता प्राप्त करायची आहे’, असा आरोप इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी केला. इराणच्या अणुकार्यक्रमाला विरोध करत असताना, इराणच्या जनतेशी इस्रायलचे काहीच वैर नसल्याचे गांत्झ यांनी स्पष्ट केले. पण इराणच्या राजवटीकडून हिजबुल्लाह, हौथी या दहशतवादी संघटनांना मिळणार्‍या समर्थनाविरोधात इस्रायलची कारवाई सुरू राहिल, असा इशारा संरक्षणमंत्री गांत्झ यांनी दिला.

येत्या काळात या क्षेत्रात युद्ध पेटले तर ते फक्त दोन देशांतील लष्करापर्यंत मर्यादित नसेल. या युद्धात संबंधित देशातील, भागातील नागरिकही होरपळून निघतील, अशी भीती इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली. यासाठी इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी लेबेनॉनमधील हिजबुल्लाह, गाझापट्टीतील हमास, इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांनी नागरी वस्त्यांच्या गर्दीत उभारलेल्या क्षेपणास्त्रांच्या गोदामांचा दाखला दिला. या दहशतवादी संघटनांच्या नागरी वस्त्यांमधील शस्त्रास्त्रांच्या गोदामाची इत्यंभूत माहिती इस्रायलकडे असल्याचे गांत्झ यांनी बजावले.

‘हिजबुल्लाह किंवा हमासने इस्रायलवर हल्ले चढविले तर त्यात ज्यूंबरोबर इस्रायलमधील अरबांचाही बळी जाईल. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इस्रायलने लेबेनॉन, गाझातील क्षेपणास्त्रांच्या तळावर हल्ला चढविला तर त्यातही स्थानिकांचा बळी मोठ्या प्रमाणात जाईल’, याची जाणीव गांत्झ यांनी करून दिली. काही महिन्यांपूर्वी लेबेनॉनची राजधानी बैरूतमध्ये हिजबुल्लाहने साठविलेल्या अमोनियम नायट्रेटच्या गोदामात स्फोट होऊन त्यात निरपराध नागरिकांचा बळी गेल्याची आठवण गांत्झ यांनी यावेळी करून दिली.

इराण अण्वस्त्रसज्ज होऊ नये, यासाठी इस्रायलने सर्व पर्याय मोकळे ठेवले आहेत. यामध्ये इराणच्या अणुकार्यक्रमावर थेट कारवाई करण्याच्या पर्यायाचाही समावेश असल्याचे गांत्झ म्हणाले. तसेच आधीच्या ट्रम्प प्रशानासनाप्रमाणे अमेरिकेतील सध्याच्या बायडेन प्रशासनाबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी इस्रायलचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती संरक्षणमंत्र्यांनी दिली.

English हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info