रशियाचे किव्हसह पूर्व व दक्षिण युक्रेनमध्ये जोरदार क्षेपणास्त्र हल्ले

दक्षिण युक्रेनमध्ये

मॉस्को/किव्ह – ब्लॅक सीमधील युद्धनौकेवर झालेला हल्ला व पाश्‍चिमात्य देशांकडून युक्रेनला देण्यात येणार्‍या संरक्षणसहाय्याला रशियाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राजधानी किव्हनजिक असलेल्या मिलिटरी फॅक्टरीसह पूर्व तसेच दक्षिण युक्रेनमध्ये रशियाने तीव्र क्षेपणास्त्र हल्ले चढविले आहेत. या हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पहिल्यांदाच युक्रेनच्या लष्करी जीवितहानीची माहिती जाहीर केली. रशियाविरोधातील युद्धात युक्रेनने जवळपास तीन हजार जवान गमावले असून १० हजारांहून अधिक जखमी झाल्याचे सांगितले आहे.

रशियाच्या ‘ब्लॅक सी फ्लीट’चे नेतृत्त्व करणारी ‘मोस्कव्हा’ ही ‘मिसाईल क्रूझर शिप’ बुडाल्याची कबुली रशियाच्या संरक्षण विभागाने शुक्रवारी दिली होती. ही युद्धनौका त्यावर लागलेल्या आगीमुळे बुडाल्याचा खुलासा रशियाकडून करण्यात आला होता. मात्र युक्रेन व अमेरिकेने युद्धनौकेवर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे दावे केले आहेत. युक्रेनने नेपच्यून या ‘अँटी शिप मिसाईल्स’च्या सहाय्याने मोस्कव्हा बुडविल्याचे म्हटले आहे. रशियाच्या संरक्षणदलांसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात असून त्याविरोधात रशिया जोरदार प्रत्युत्तर देईल, असे संकेत मिळत आहेत.

दक्षिण युक्रेनमध्ये

शुक्रवारी तसेच शनिवारी युक्रेनमध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनी या संकेतांना दुजोरा मिळत असल्याचे दिसते. गुरुवारी रशियाने किव्हनजिक असलेल्या युक्रेनच्या मिसाईल फॅक्टरीला लक्ष्य करण्यात आले होते. त्यापाठोपाठ शनिवारी पहाटे राजधानी किव्हनजिक असणार्‍या डार्नित्स्की भागातील मिलिटरी फॅक्टरीवर क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला. ही फॅक्टरी पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा रशियाने केला आहे. या हल्ल्यात एकाचा बळी गेला आहे तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती युक्रेनच्या यंत्रणांनी दिली.

किव्हपाठोपाठ पश्‍चिम युक्रेनमधील लिव्ह, पूर्व युक्रेनमधील खार्किव्ह, दक्षिण युक्रेनमधील मायकोलेव्ह व खेर्सन भागातही क्षेपणास्त्र तसेच रॉकेट हल्ले चढविण्यात आले. पूर्व युक्रेनमधील डोेनेत्स्क तसेच लुहान्स्क प्रांतातील अनेक शहरांवर तोफगोळे, मॉर्टर्स व रॉकेट्सचा मारा करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. मारिपोल शहरातील स्टील फॅक्टरी रशियन पथकाने ताब्यात घेतल्याचा दावाही करण्यात आला आहे. रशियन हल्ल्यांची व्याप्ती वाढत असतानाच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेनच्या लष्करी जीवितहानीची माहिती जाहीर केली.

दक्षिण युक्रेनमध्ये

२४ फेब्रुवारी रोजी रशियाने चढविलेल्या हल्ल्यात युक्रेनने जवळपास तीन हजार जवान गमावले असून सुमारे १० हजार जण जखमी झाले आहेत. नागरी जीवितहानीची पूर्ण आकडेवारी अद्याप हाती आली नसल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. त्याचवेळी पूर्व तसेच दक्षिण युक्रेनमध्ये युक्रेनच्या संरक्षणदलांसमोर असलेल्या अडचणी वाढल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, अमेरिका व पाश्‍चिमात्य देशांकडून युक्रेनला करण्यात येणार्‍या संरक्षणपुरवठ्यावरून रशियाने आक्रमक इशारा दिला आहे. ‘अमेरिका व सहकारी देशांनी युक्रेनचे बेजबाबदार लष्करीकरण थांबवावे. या धोरणाचे प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय सुरक्षेवर अपरिमित व गंभीर परिणाम होतील’, असे रशियाने बजावले.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info