मॉस्को/किव्ह – पूर्व युक्रेनमधील अत्यंत महत्त्वाचे शहर व बंदर असणार्या मारिपोलवर ताबा मिळविल्याचा दावा रशियाने केला आहे. शहरातील एका स्टील फॅक्टरीत युक्रेन व परदेशी जवानांचा सहभाग असलेल्या तुकडीने आश्रय घेतला आहे. या तुकडीला शरण येण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली. त्याचवेळी शनिवारी रात्रीपासून रशियाने पुन्हा हल्ल्यांची तीव्रता वाढविली असून युक्रेनमधील ६० हून अधिक भागांना लक्ष्य केल्याचे रशियन प्रवक्त्यांनी सांगितले.
मारिपोल हे युक्रेनमधील सर्वात महत्त्वाचे बंदर असून युक्रेनच्या नौदलाचा आघाडीचा तळ म्हणून ओळखले जाते. पूर्व युक्रेनमधील डोनेत्स्क व लुहान्स्क प्रांताना सागरी मार्गाने क्रिमिआबरोबर जोडणारे शहर म्हणून मारिपोल रशियासाठी निर्णायक ठरते. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून रशियन फौजांनी या शहरावर हल्ले सुरू केले होते. जवळपास दीड महिन्यांनंतर शहरावर ताबा मिळविण्यात रशियाला यश मिळाले आहे. शहरातील ‘ऍझोव्हस्टॅल’ ही फॅक्टरीत युक्रेनी लष्कराच्या एका तुकडीने आश्रय घेतला आहे. या तुकडीने शरणागती पत्करावी, असे आवाहन रशियन फौजांनी केले आहे. मात्र त्याला अद्याप प्रतिसाद देण्यात आलेला नाही.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी लष्करी तुकडीची प्रशंसा करीत आपण त्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. रशियन फौजांनी युक्रेनी जवानांची हत्या केली तर युक्रेन शांतीचर्चेतून माघार घेईल, असा इशारा झेलेन्स्की यांनी दिला आहे. मारिपोलमधील युक्रेनी नेत्यांनी आपले जवान माघार घेणार नसून संघर्षास तयार असल्याचे बजावले आहे. मात्र रशिया लवकरच फॅक्टरीवर ताबा मिळवेल, असा दावा रशियन सूत्रांनी केला आहे. मारिपोलवरील ताब्यानंतर रशिया युक्रेनमधील लष्करी मोहीम अधिक तीव्र करेल, असे संकेतही देण्यात येत आहेत.
शनिवारपासून रशियाने आपल्या हल्ल्यांची तीव्रता व व्याप्ती अधिकच वाढविल्याचे समोर येत आहे. शनिवारी रात्रीपासून रशियन फौजांनी युक्रेनच्या विविध शहरांमधील ६८ जागांना लक्ष्य केल्याचे संरक्षण विभागाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव यांनी सांगितले. युक्रेनची राजधानी किव्हनजिक असणार्या ‘ऍम्युनिशन फॅक्टरी’वर क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला. खार्किव्हमध्येही लष्करी जागांना लक्ष्य करण्यात आले आहे. तर ओडेसानजिक युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरविणारे मिलिटरी ट्रान्सपोर्ट प्लेन पाडल्याचेही रशियन प्रवक्त्यांनी सांगितले. फेब्रुवारी महिन्यात रशियाची कारवाई सुरू झाल्यानंतर युक्रेनची १३४ लढाऊ विमाने, ४७० ड्रोन्स व दोन हजारांहून अधिक तोफा व सशस्त्र वाहने नष्ट करण्यात आल्याची माहितीही संरक्षण विभागाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव यांनी दिली.
दरम्यान, राजधानी किव्हनजिक युक्रेनियन नागरिक तसेच जवानांचे मृतदेह सापडल्याची घटना समोर आली आहे. युक्रेनमधील यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ९०० जणांचे मृतदेह मिळाले आहेत. यापूर्वी बुचा भागात सुमारे ४००हून अधिक जणांना जमिनीत गाडल्याचा दावा युक्रेन सरकारने केला होता.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |