पाश्चिमात्यांनी युक्रेनला केलेल्या सहाय्यानंतरही रशिया आपल्या लष्करी मोहिमेची उद्दिष्टे बदलणार नाही

- रशियन प्रवक्त्यांचा इशारा

लष्करी मोहिमेची उद्दिष्टे

मॉस्को – ‘अमेरिका व ब्रिटनसह नाटो युक्रेनला सातत्याने रशियासंबंधी गोपनीय माहिती पुरवित असल्याची कल्पना आहे. मात्र यामुळे रशियाने युक्रेनमध्ये सुरू केलेल्या लष्करी मोहिमेची उद्दिष्टे बदलणार नाहीत’, असा इशारा रशियन सरकारचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी दिला. उलट पाश्चिमात्यांकडून पुरविण्यात येणारी माहिती व शस्त्रांमुळे रशिया-युक्रेन युद्धावर लवकर तोडगा निघण्याची शक्यता लांबली आहे, असेही पेस्कोव्ह यांनी बजावले. रशियन अधिकारी तसेच युद्धनौकांना लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेने युक्रेनला गुप्त माहिती पुरविल्याच्या बातम्या अमेरिकी माध्यमांकडून प्रसिद्ध झाल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना पेस्कोव्ह यांनी इशारा दिला.

अमेरिकेच्या ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ या दैनिकाने रशियन अधिकाऱ्यांच्या मृत्यूमागे अमेरिकी गुप्तचर यंत्रणांचा हात असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. अमेरिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती देत असल्याचे दैनिकाने म्हटले होते. त्यापाठोपाठ ‘एनबीसी न्यूज’ या वृत्तवाहिनीने ‘मोस्कव्हा’ या रशियन युद्धनौकेवरील हल्ल्यामागेही अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी पुरविलेल्या माहितीचा हात असल्याचा दावा केला आहे. एकापाठोपाठ देण्यात आलेल्या या बातम्यांमुळे अमेरिकेच्या युक्रेन युद्धातील थेट सहभागाला दुजोरा मिळाल्याचे दिसत आहे. अमेरिकेने अधिकृत पातळीवर या सहभागाचे खंडन केले आहे. मात्र गुप्तचर अधिकारी व सूत्रे अमेरिका सातत्याने युक्रेनी यंत्रणांच्या संपर्कात असल्याकडे लक्ष वेधत आहेत. या पार्श्वभूमीवर रशियन प्रवक्त्यांनी दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची ठरते. ‘पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला पुरविण्यात येणारी गोपनीय माहिती व इतर गोष्टींची रशियाच्या लष्कराला पूर्ण जाणीव आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रशियन संरक्षणदले योग्य ती पावले उचलत आहे’, असे पेस्कोव्ह यांनी स्पष्ट केले.

लष्करी मोहिमेची उद्दिष्टे

रशियन प्रवक्त्यांच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर रशियन संरक्षणदलांनी डोनेत्स्क व लुहान्स्कमध्ये जोरदार हल्ले चढविल्याचे समोर आले. या हल्ल्यांमध्ये युक्रेनी लष्कराचा शस्त्रसाठा तसेच लढाऊ विमाने व ड्रोन्स लक्ष्य करण्यात आल्याची माहिती संरक्षणदलांनी दिली. डोन्बास क्षेत्रातील खार्किव्ह, इझियम व क्रॅमाटोर्स्क या भागांमध्ये जबरदस्त संघर्ष सुरू असल्याचेही सांगण्यात येते. पुढील काही दिवसांमध्ये रशिया किव्ह क्षेत्रात नव्या हल्ल्यांना सुरुवात करेल, असे संकेतही युक्रेनी अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

लष्करी मोहिमेची उद्दिष्टे

दरम्यान, रशियन फौजांनी मारिपोलमधील स्टील फॅक्टरीच्या परिसरात नवे हल्ले चढविल्याचे दावे समोर आले आहेत. युक्रेनने केलेल्या दाव्यानुसार, रशियाने रणगाड्यांच्या सहाय्याने हल्ला केला असून त्यात युक्रेनचा एक जवान ठार झाला आहे. येत्या दोन दिवसात रशियन लष्कर फॅक्टरीच्या संपूर्ण परिसरावर ताबा मिळविण्याची शक्यताही माध्यमांनी वर्तविली आहे. हे हल्ले सुरू असतानाच स्टील फॅक्टरीत आश्रय घेतलेल्या 500 हून अधिका नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाकडून सांगण्यात आले.

मोस्कव्हापाठोपाठ रशियाच्या ‘ॲडमिरल मॅकारोव्ह’ या युद्धनौकेवर हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. ही युद्ध नौका ‘ब्लॅक सी’ सागरी क्षेत्रात तैनात आहे. रशियाने यासंदर्भातील वृत्त फेटाळले आहे.

हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info