रशियाचे डोन्बाससह दक्षिण व मध्य युक्रेनमध्ये जोरदार हल्ले

मॉस्को/किव्ह – युक्रेनच्या डोन्बास क्षेत्रावर ताबा मिळविण्यासाठी रशियाने आपल्या हल्ल्यांच्या तीव्रता अधिकच वाढविली आहे. गेल्या 24 तासांमध्ये रशियाने डोन्बासमधील दोन शहरे ताब्यात घेतली असून सेव्हेरोडोनेत्स्क व लिशिचान्स्कवरील ताब्यासाठी निर्णायक लढाई सुरू आहे. डोन्बासबरोबरच मध्य युक्रेनमधील डिनिप्रोपेट्रोव्हस्क तसेच दक्षिणेतील झॅपोरिझ्झिआ प्रांतातही क्षेपणास्त्र तसेच हवाईहल्ले झाल्याची माहिती समोर आली आहे.

डोन्बास

मारिपोलवरील ताब्यानंतर रशियाने आपली लष्करी मोहिम डोन्बासवर केंद्रित केली आहे. डोन्बास हे क्षेत्र युक्रेनमधील महत्त्वाचे औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखण्यात येते. कोळशाच्या खाणी, शेल गॅसचे साठे, अवजड यंत्रांची निर्मिती यामुळे युक्रेनच्या अर्थव्यवस्थेत हे क्षेत्र महत्त्वाचे मानले जाते. या भागात रशियन भाषिकांची संख्या मोठी असल्याने अनेक बाबतीत हे क्षेत्र रशियाशी जवळीक साधून आहे. त्यामुळेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी डोन्बासवरील रशियाचा ताबा हा प्राधान्याचा मुद्दा बनविल्याचे सांगण्यात येते.

डोन्बास

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस युक्रेनवर हल्ले चढविल्यानंतर रशियन फौजांनी या भागातील मोहीम मंदगतीने सुरू ठेवली होती. मात्र युक्रेनवरील आक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यात रशियाने आपले सर्व लक्ष डोन्बासवर केंद्रित केल्याचे दिसत आहे. येत्या काही दिवसात रशियन फौजांनी डोन्बासवर संपूर्ण ताबा मिळविल्यास राष्ट्राध्यक्ष पुतिन संघर्षबंदीची घोषणा करु शकतात, असे दावेही माध्यमे तसेच विश्लेषकांकडून करण्यात येत आहेत. रशियन फौजांकडून सध्या सुरू असलेले हल्ले त्याला दुजोरा देणारे दिसत आहेत.

डोन्बास

गेल्या काही दिवसात रशियाने डोन्बासमधील लुहान्स्क प्रांताच्या बहुतांश भागावर ताबा मिळविला आहे. लुहान्स्कची राजधानी असणारे सेव्हेरोडोनेत्स्क ताब्यात आल्यास हा संपूर्ण प्रांत रशियाच्या ताब्यात येईल. त्यासाठी गेल्या आठवड्यापासून सेव्हेरोडोनेत्स्कवर तीव्र हल्ले सुरू असून शहराच्या काही भागांमध्ये शिरकाव करण्यात रशियन फौजांनी यश मिळविले आहे. सेव्हेरोडोनेत्स्कबरोबरच डोनेत्स्कची राजधानी असणाऱ्या लिशिचान्स्कवरील ताब्यासाठीही निर्णायक संघर्ष सुरू आहे. रशियन लष्कराने या शहराला वेढण्याची तयारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यापूर्वी डोनेत्स्कमधील ‘स्विटलोडार्स्क’ हे शहर रशियाने ताब्यात घेतले आहे.

दोन प्रमुख शहरांव्यतिरिक्त क्रॅमाटोर्स्क, लिमन, ॲव्हडिव्हका व बाखमतवरही हल्ले सुरू आहेत. रशियन फौजांनी तोफा, रणगाडे व रॉकेट्सबरोबरच मोठ्या प्रमाणावर हवाईहल्ले सुरू केल्याची माहिती युक्रेनी अधिकाऱ्यांनी दिली आहे. डोन्बासव्यतिरिक्त मध्य युक्रेनमधील डिनिप्रोपेट्रोव्हस्क व दक्षिणेतील झॅपोरिझ्झिआ प्रांतावरही जोरदार हल्ले सुरू आहेत. बुधवारी झॅपोरिझ्झिआ प्रांतात रशियाने चार क्रूझ मिसाईल्सचा मारा केला. डिनिप्रोपेट्रोव्हस्कवरही तीन क्षेपणास्त्रे डागण्यात आली असून हवाईहल्ले झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाच्या आक्रमणाविरोधात पाश्चिमात्य देशांमध्ये एकजूट नसल्याचा आरोप केला आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info