राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून युक्रेनची राजधानी किव्हवर नवे क्षेपणास्त्र हल्ले

युक्रेनची राजधानी

मॉस्को/किव्ह – अमेरिका व सहकारी देशांनी युक्रेनला दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे तसेच संबंधित यंत्रणा पुरविल्या तर रशिया नव्या लक्ष्यांवर हल्ले चढविल, असा खरमरीत इशारा राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी दिला. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर रशियन फौजांनी युक्रेनची राजधानी किव्हला हल्ल्यांचे लक्ष्य केले आहे. राजधानी किव्हवर रविवारी पहाटे पाच क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्याचवेळी रशियाच्या स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सनी दक्षिण युक्रेनमधील मायकोलेव्ह शहर व नजिकच्या भागात क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसात रशियाकडून डोन्बास क्षेत्राला लक्ष्य करून तीव्र हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यांमध्ये रशियाला मोठे यशही मिळाले असून या क्षेत्रातील अनेक शहरे व मोक्याच्या जागांवर रशियाने नियंत्रण मिळविले आहे. त्याचवेळी सेव्हेरोडोनेत्स्क व लिशिचान्स्क शहरांवर ताबा मिळविण्यासाठी रशिया व युक्रेनच्या लष्करात निर्णायक संघर्ष सुरू आहे. या संघर्षात युक्रेनी फौजांना माघार घ्यावी लागत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्या होत्या. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला नवी प्रगत क्षेपणास्त्रे व रॉकेट यंत्रणा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. या यंत्रणांमध्ये रशियातही हल्ले चढविण्याची क्षमता असल्याने रशियाकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

युक्रेनची राजधानी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाश्चिमात्य देशांना खणखणीत इशारा दिला. अमेरिका व सहकारी देशांनी युक्रेनला दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे पुरविली तर रशिया नव्या लक्ष्यांवर आक्रमक हल्ले सुरू करील, असे पुतिन यांनी बजावले. रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत लक्ष्य न केलेल्या भागांवर रशिया तीव्र हल्ले करील, असे रशियन राष्ट्राध्यक्षांनी आपल्या इशाऱ्यात म्हंटले आहे. यापूर्वी पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला पुरविलेल्या यंत्रणाही रशियन फौजांनी उद््‌‍ध्वस्त केल्या असल्याची जाणीव पुतिन यांनी यावेळी करून दिली. त्याचवेळी युक्रेनला देण्यात येणाऱ्या परदेशी यंत्रणा हा रशिया-युक्रेन युद्ध अधिकाधिक लांबविण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.

युक्रेनची राजधानी

रशियन राष्ट्राध्यक्षांची ही मुलाखत प्रसिद्ध होत असतानाच रशियन फौजांनी युक्रेनची राजधानी किव्हला पुन्हा एकदा लक्ष्य केले. रविवारी पहाटे राजधानी किव्ह व नजिकच्या क्षेत्रात पाच क्रूझ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या क्षेपणास्त्रांनी किव्हमधील परदेशी शस्त्रसाठा व रणगाड्यांना लक्ष्य केल्याची माहिती रशियाने दिली आहे. युक्रेनने रशियन क्षेपणास्त्रहल्ल्यांना दुजोरा दिला असला तरी नक्की काय लक्ष्य केले याची माहिती दिलेली नाही. किव्हमधील माघारीनंतर जवळपास महिन्याभरानंतर मोठा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला आहे.

राजधानी किव्हबरोबरच दक्षिणेतील मोक्याचे शहर असलेल्या मायकोलेव्हलाही लक्ष्य करण्यात आले. रशियाच्या ‘टीयू-95′ या स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सनी शहरावर क्षेपणास्त्रांचा मारा केला. यात परदेशी शस्त्रसाठ्यांना लक्ष्य केल्याचा दावा रशियन संरक्षणदलाने केला आहे. मात्र युक्रेनने रशियन क्षेपणास्त्रांचा हल्ला परतविल्याचे म्हटले आहे.

English    हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info